ठाणे: कोल्हापूर येथून गुजरातकडे ऑईल घेऊन जाणाऱ्या चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने ठाण्याकडून घोडबंदरकडे जाणाºया मार्गावर सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास टँकर उलटल्याची घटना समोर आली. या घटनेत राजू नामक टँकर चालक जखमी झाला असून अपघातामुळे वाहतुकीवर चांगलाच परिणाम झाला. टँकर पलटी झाल्यामुळे पातलीपाडा सेवा रस्त्यावरील वाहतूक सुमारे सहा तास बंद ठेवावी लागल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली.
जखमी चालक राजू हा कोल्हापूर गोकुळ शिरगाव येथून गुजरातच्या वापी येथे २७ हजार ८२९ लीटर रि रिफाईन ल्युब्रिकेटींग आॅईल घेऊन निघाला होता. गुरुवारी पहाटेच्या सुमारास ठाण्यातील घोडबंदर रोडने जाताना, टँकर पातलीपाडा ब्रिजजवळ, हिरानंदानी पार्क समोर उलटला. चालकाचा टँकरवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली. यामध्ये चालक राजू याच्या डोक्याला किरकोळ दुखापत झाली आहे. आॅईलचा टँकर उलटल्याने रोडवर मोठ्या प्रमाणात ऑईल पडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी चितळसर पोलिस एका हायड्रा मशीन तसेच एका हायड्रोलिक क्रेन मशीनसह, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी , अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. जखमी चालकाला उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.
उलटलेला ऑईलचा टँकर सुमारे सहा तासानंतर मेकॅनिक क्रेनच्या सहाय्याने उचलून एका बाजूला करण्यात आला. ऑइल सांडलेल्या ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाच्या जवानांनी माती पसरवून हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा केला. पहाटे ६ ते दुपारी १२ या दरम्यान सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवावी लागली होती. तसेच मुख्य रस्त्यावरही वाहतूकीचा काही काळ खोळंबा झाला होता. दुपारी १२ नंतर मात्र, ही वाहतूक पूर्ववत झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.