ठाणे: सुशिक्षित आहात सुजाण बना असा संदेश देत ठाणे वाहतूक पोलिसांनी 'सडक सुरक्षा जीवन रक्षा' या अभियानाला सुरुवात करण्यात आली. ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. रस्ते सुरक्षा अभियान २०२१ चा शुभारंभ आज झाला, त्या अंतर्गत ठाणे वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या पुढारकाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यंदा ही रस्ते सुरक्षा मोहीम एक महिना चालणार आहे.
रस्ते सुरक्षा अभियानात तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या ठाणे वाहतूक विभागाने ही मोहिम अधिक व्यापक करण्याचा निश्चय केला असल्याच बाळासाहेब पाटील यांनी यावेळी बोलताना सांगितलं. वाहतूकीचे नियम पाळण्याचा संदेश तरुणाईपर्यंत पोहचवण्यासाठी आता ठाणे वाहतूक पोलिसांनी ठाणे वाहतूक विभागाचे स्वतंत्र फेसबुक पेज, इन्स्टाग्राम पेजची मदत घेणार आहे. या नवीन पेजचं लौंचिग यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. त्यासोबतच ठाणे वाहतूक पोलिसांचे म्हणणे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी अभिनेता मंगेश देसाई याची ठाणे वाहतूक पोलिसांचा 'सदिच्छादूत' म्हणून निवड करण्यात आली. प्रतिष्ठित कलाकारांच्या मदतीने वाहतुकीचे नियम नवीन पिढीला समजवण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात येणार आहेत.
ठाणे वाहतूक पोलिसातील ज्या योद्धयांनी कोरोना काळात उल्लेखनीय काम केले त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. कोरोना काळात वाहतूक व्यवस्था संभाळण्यापासून ये गरजू मजूर, गरोदर महिला, कोरोना रुग्ण यांना मदत, भुकेलेल्याना अन्न देण्याच्या दृष्टीने उल्लेखनीय काम केलेल्या योध्दयांचा यावेळी गौरव करण्यात आला. यासोबतच वाहतूकीची शिस्त घरोघरी पोहचवण्यासाठी एका विशेष दिनदर्शिकेचे यानिमित्ताने अनावरण करण्यात आलं.
कोरोना काळात वाहतूक पोलीस रस्त्यावर ठाम उभा होता म्हणूनच कोरोनाची खरी झळ आपल्यापर्यंत पोहोचली नाही असे गौरवोद्गार ठाणे मनपाचे आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी काढले. तर कोरोनाच्या काळात आम्ही लागेल ती मदत पालिकेला केलेली असली तरीही पालिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी केलेल्या प्रयत्नांची शिकस्त केली म्हणूनच हा दुर्धर आजार आटोक्यात आणण शक्य झालं असे ठाणे पोलिसांचे आयुक्त विवेक फणसाळकर यांनी सांगितलं.
कोरोना काळात 33 पोलिसांचा मृत्यू झाला त्यांची कमतरता कधीही भरून येणार नाही असेही त्यांनी प्रांजळपणे कबुल केलं. मात्र अनेक पोलिसांना अवघड काळात त्यांच्या कुटूंबियांनी केलेल्या सहकार्याचा त्यांनी कृतज्ञभाव व्यक्त केला. पोलिसांनी केलेल्या कामासोबतच सर्वसामान्य लोकांचे आलेले कडूगोड अनुभव त्यांनी यावेळी सांगितले.
ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ठाणे मनपाचे आयुक्त डॉ. बिपीन शर्मा, पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त दत्ता कराळे, पश्चिम विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त अनिलकुमार कराळे, आणि सर्व प्रादेशिक उपयुक्त आणि ठाणे पोलीस कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
ठाणे पोलिसातील सर्व कोरोना योद्धयांना मिळणार कोविड लस
यावेळी ठाणे पोलीस आयुक्त यांनी ठाणे मनपा आयुक्त याना काल काही ठाणे पोलिसांना प्रातिनिधिक स्वरूपात कोव्हिड लस द्यावी अशी मागणी केली. त्यावर आयुक्तांनी सर्व पोलिसांना लवकरच कोव्हिड लस देण्यात येईल अशी ग्वाही आयुक्त डॉ. बिपीन शर्मा यांनी दिली.