ठाणे : कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर लावून मोटारसायकल चालविणाऱ्या चालकांसह काळ्या फिल्म असलेल्या वाहनचालकांविरुद्धची कारवाई ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेने सुरू केली आहे. ठाणे शहर पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गेल्या चार दिवसांत ७९५ वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये १९० दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई केल्याची माहिती वाहतूक शाखेने दिली.
दुचाकी वाहनांवर मोटार वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर कर्णकर्कश आवाज करणाऱ्या १२१ मोटारसायकलींचे सायलेन्सर्स तत्काळ काढून ते नष्ट करण्यात आले. तसेच काळ्या फिल्म असलेल्या काचा लावून प्रवास करणाऱ्या ४८४ वाहनांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली आहे. यामध्येही ४०४ वाहनांच्या काळ्या फिल्म तत्काळ उतरविण्यात आल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर आयुक्तालयातील ज्येष्ठ नागरिक तसेच लहान मुले यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम करणाऱ्या गोष्टींवर सध्या पोलिसांकडून लक्ष देण्यात येत आहे. त्यात अनेक दुचाकीस्वारांनी त्यांच्या मोटारसायकल सायलेन्सरमध्ये बदल केले. त्यामुळे मोठ्या आवाजाने नागरिकांना तसेच लहान मुलांना त्याचा त्रास होतो. त्यामुळे निद्रानाशासारखे अनेक आजार बळावत आहेत. अशा तक्रारी नागरिकांनी प्रत्यक्ष भेटीद्वारे तसेच सोशल मीडियाद्वारे वाहतूक पोलिसांकडे केल्या होत्या. ठाणे शहरातील अनेक नागरिक त्यांच्या चारचाकी वाहनांना परवानगी नसलेल्या काळ्या फिल्म काचांना लावून सर्वत्र वावरत आहेत. अशा प्रकारच्या वाहनांमध्ये बेकायदेशीर कृत्ये, महिलासंबंधी अत्याचार तसेच अनेक गुन्हेगारी स्वरुपाच्या गोष्टी घडण्याचीही भीती आहे. पोलीस नाकाबंदीमध्ये तपासणी करताना अशा प्रकारच्या वाहनांमुळे अडथळा निर्माण होतो. त्या अनुषंगाने वाहनाच्या मूळ ठेवणीमध्ये बदल करून कर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर तसेच काळ्या फिल्म असलेल्या वाहनांवर कडक कारवाई सुरू केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी दिली.
ठाणे शहर वाहतूक शाखेने ठाण्यातील १८ वाहतूक उपविभागांमार्फत १४ ते १७ जून २०२१ या कालावधीत मॉडिफाइड सायलेन्सर तसेच काळ्या फिल्म असलेल्या वाहनचालकांविरुद्ध मोहीम राबविली. त्यामध्ये १९० दुचाकींवर दंडात्मक कारवाई केली, तर १२१ मोटारसायकलींचे मॉडिफाइड सायलेन्सर्स तत्काळ काढून ते नष्ट केले. तसेच काळ्या फिल्म असलेल्या ४८४ वाहनांवर दंडात्मक कारवाई झाली, तर ४०४ वाहनांच्या ब्लॅक फिल्म्स तत्काळ काढून टाकल्याचीही माहिती वाहतूक शाखेने दिली.