ठाणे : वाहतूककोंडी सोडवण्यासाठी सिग्नलवर उभे राहून शिटी वाजवत कर्तव्य बजावणारे ट्रॅफिक पोलीस प्रदूषणामुळे विविध आजारांचे बळी ठरतात. हे लक्षात घेऊन ठाण्यातील सिंघानिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रोजेक्टद्वारे ट्रॅफिक पोलिसांसाठी डिजिटल व्हिसल तयार केली आहे. हे यंत्र पोलिसांना बोटाद्वारे हाताळता येणार असल्याने पोलिसांना मास्कचा वापर करता येऊ शकतो. परिणामी, त्यांचे स्वास्थ्य राखण्यास मदत होईल, असा विश्वास त्या विद्यार्थ्यांना आहे.अहमदाबाद येथे होणाºया पंचविसाव्या राष्टÑीय विज्ञान परिषदेसाठी ठाण्यातील चार प्रकल्पांची निवड झाली आहे. त्यापैकी ठाण्याच्या सिंघानिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या ‘इम्पॅक्ट आॅफ वेहिक्युलर पल्युशन आॅफ ट्रॅफिक पोलीस’ या प्रकल्पाचाही त्यात समावेश आहे. तेजस्विनी देशमुख, समृद्धी शाह या विद्यार्थिनींनी तो सादर केला असून शिक्षिका उषावती शेट्टी यांनी त्यांना मार्गदर्शन केलेले आहे. या प्रकल्पासाठी त्यांनी सुमारे वर्षभर ठाण्यातील चार प्रमुख सिग्नल अर्थात कॅडबरी सिग्नल, तीनहातनाका, नितीन कंपनी आणि कळवानाका या ठिकाणी सर्व्हे केला. तेथील ट्रॅफिक पोलिसांशी चर्चा केली. पोलिसांना मास्क लावून शिटी वाजवता येत नाही. त्यामुळे मास्कचा वापर होत नाही. जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केल्यावर ट्रॅफिक पोलिसांना अस्थमा, श्वासोच्छ्वासाशी निगडित अनेक विकार होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कोंडी सोडवण्यासाठी शिटीचा वापर व्हावा आणि पोलिसांच्या आरोग्याची काळजीही घ्यावी, या उद्देशाने या ग्रुपने डिजिटल व्हिसलचा तोडगा काढला. त्यांनी तयार केलेल्या यंत्रात शिटीचा आवाज रेकॉर्ड आहे. केवळ बोटाने बटण दाबून शिटीचा आवाज येतो. गरजेनुसार या यंत्रात आवाज कमीजास्त करता येतो. हे यंत्र पोलिसांना घड्याळाप्रमाणे हातावरही बांधता येणे शक्य आहे. मास्क घालूनही या शिटीचा वापर करता येणार आहे, अशी माहिती प्रकल्पाच्या मार्गदर्शिका उषावती शेट्टी यांनी दिली. हे यंत्र आम्ही महापालिका प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मनीषा प्रधान यांच्यासह विविध ट्रॅफिक पोलीस अधिकाºयांना दाखवल्याचेही त्यांनी सांगितले. ते बनवण्यासाठी साधारण २०० रुपये खर्च अपेक्षित आहे. दोन व्यक्ती सुमारे दोन दिवसांत हे यंत्र तयार करू शकतात, अशी माहितीही त्यांनी दिली.
वाहतूक पोलिसांना मिळाला डिजिटल व्हिसलचा पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 12:46 AM