ठाणे : रस्त्यात सापडलेले एका वाहतूक पोलिसाचे पैशांनी भरलेले पाकीट ठाण्यातील तरुणांनी परत करून प्रामाणिकपणाचे दर्शन घडविले. तरुणांच्या या प्रामाणिकपणाचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
ठाणे वाहतूक पोलीस कर्मचारी उमेश खताते यांचे पैशांनी भरलेले पाकीट समतानगर येथे रोहित साळुंखे, हर्षद शिंदे, बंटी रहाटे, अंकित कंच्रला यांना सापडले. यामध्ये वीस हजार रुपये रोख, एटीएम कार्ड आणि खताते यांचे ओळखपत्र होते. तरुणांनी हे पाकीट खताते यांना परत करण्याकरिता समर्थ फाऊंडेशनचे संस्थापक शहाजी खुस्पे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी खताते यांना हे पाकीट सापडल्याचे सांगून समर्थ फाऊंडेशनच्या कार्यालयात बोलावून घेतले. या ठिकाणी चारही तरुणांच्या हस्ते व खुस्पे यांच्या उपस्थितीत हे पाकीट खताते यांना देण्यात आले. या तरुणांच्या प्रामाणिकपणाची दखल घेत खुस्पे यांनी त्यांचा सत्कार करून त्यांचे मनोबल वाढवले. यावेळी सिद्धार्थ सोनवणे, चंद्रकांत डांगे आणि सुधीर गांधी आदी उपस्थित होते.
-------------
फोटो मेलवर