लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : शहराच्या विविध भागात पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पालिका वेळ मिळत नसल्याने आता पालिकेचे हे काम वाहतूक पोलिसांना करावे लागत आहे. तीन पेट्रोल पंप परिसरात मोठ्याप्रमाणात खड्डे पडले असून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ नये यासाठी बुधवारी वाहतूक पोलिसांना ते बुजववावे लागले. शासनाचा एक भाग असल्याची भावना व्यक्त करून वाहतूक पोलीस खड्डे बुजवण्याचे काम करत होते. ठाणे महापालिकेने शहरातील खडड््यांकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले आहे. रस्त्यावर पडलेले खड्डे आणि धोकादायक झाडांच्या संदर्भात महापालिकेला वाहतूक पोलिसांनी पत्रदेखील दिले. परंतु, कामचुकार महापालिकेची वाट पाहता बुधवारी कर्तव्य म्हणून ते स्वत:च तीन पेट्रोल पंप परिसरातील खड्डे बुजवण्यासाठी सरसावल्याचे चित्र पाहायला मिळाले.शहरात नेमके किती खड्डे आहेत याचा सर्व्हे झाला नसताना महापालिकेने केवळ ५० खड्ड्यांचा दावा केला आहे . प्रत्यक्षात संपूर्ण शहरच खड्डेमय झाले आहे. घोडबंदर रोड, कोपरी , कळवा , विटावा , अशा महत्त्वाच्या पट्ट्यातील खड्ड्यांकडे महापालिकेचे अजूनही लक्ष गेलेले नाही . विशेष म्हणजे रस्त्यांच्या दुरु स्तीसाठी प्रभाग समितीनिहाय २५ लाखांची तरतूद केली असताना हा निधी नेमका खर्च कुठे होत आहे हाच मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. खड्ड्यांच्या विरोधात भाजपचे आंदोलन एकीकडे तीन पेट्रोल पंप परिसरात (जुना आग्रा रोड ) वाहतूक पोलिसांकडून खड्डे बुजवण्याचे काम सुरु असताना दुसरीकडे भाजपाने मात्र याच परिसरात या खड्ड्यांमध्ये झाडे लावून आंदोलन केले. दोन दिवसांपूर्वी या ठिकाणी अपघात झाला असल्याची माहिती आंदोलनकर्ते आणि भाजपचे शहर उपाध्यक्ष राजेश मढवी यांनी दिली.
ठाण्यात रस्त्यावरील खड्डे वाहतूक पोलिसांनीच बुजवले
By admin | Published: July 06, 2017 6:09 AM