ठाणे : महापालिकेने चार वर्षांपूर्वी शहरातील वाहतुकीचे सर्वेक्षण केले असतानाही आता पुन्हा अद्ययावत वाहतूक सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरात नव्याने वापरात असलेले उड्डाणपूल, तीनहातनाका येथे ग्रेड सेपरेटर तयार करणे, नवीन स्टेशन, सॅटिस पूर्व, इंटरनल मेट्रो, मुख्य मेट्रो, पीआरटीएस, रस्त्यांचे रुंदीकरण आदींसह इतर कामे प्रस्तावित असल्याने आता ती पुन्हा करण्यात येणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. परंतु,यासाठी निधी कमी पडत असल्याने पादचारी पूल व सबवे या कामांसाठी ठेवलेला ५० लाखांचा निधी या कामासाठी वर्ग करून एकूण दीड कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव बुधवारी होणाऱ्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्र हे १२८ चौ.मी. असून ३५६ किमी एवढे रस्त्यांचे जाळे अस्तित्वात आहे. तसेच सद्यस्थितीत रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण पाहता, मुंंबई, जेएनपीटी येथून येणारी वाहतूक ही ठाण्यामधून पश्चिम दु्रतगती मार्गाने गुजरातकडे आणि द्रुतगती मार्गाने नाशिक, मध्यप्रदेश, आग्राकडे जाते. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर ताण पडतो. हा ताण दूर करण्यासाठी पालिकेने चार वर्षांपूर्वी वाहतुकीचा सर्व्हे केला होता. त्यासाठी तेव्हा कोट्यवधीची उधळण केली होती.
यामध्ये शहरातील अस्तित्वातील रस्त्यांचे जाळे, भविष्यात मंजूर विकास आराखड्यातून होणारे नवीन रस्ते, अस्तित्वातील ट्रॅफिक व्हॉल्युम काउंट, ट्रॅव्हल टाईम सर्व्हे, पार्किंग व्यवस्था, आदींसह इतर महत्वाच्या बाबींचा सर्व्हे केला होता. त्यानुसार आलेल्या अहवालाच्या आधारे वाहतूककोंडी दूर करण्यासाठी तीनहातनाका येथे ग्रेड सेपरेटर तयार करणे, पूर्व द्रतगती, महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजना करणे ५० चौकांचे इम्पु्रव्हमेंट प्लॅन, अंतर्गत जलवाहतूक, पेडेस्ट्रियन इम्प्रुव्हमेंट, आवश्यक त्या रस्त्यांचे रुंदीकरणाव्यतिरिक्त नवीन रस्त्यांबाबत प्राधान्यक्रम ठरवून विकास करणे, क्लस्टर योजनेअंतर्गत पुनर्विकास झाल्यावर शहराच्या वाहतुकीवर होणारा परिणाम त्यासाठी करावी लागणारी आवश्यक असणाºया पायाभूत सुविधा सुचविणे आदी बाबी सुचविण्यात आल्या होत्या.
आता याचा होणार सर्व्हेमधल्या काळात महापालिका हद्दीत स्मार्ट सिटी अभियानातून नवीन स्टेशन, सॅटिस पूर्व, महापालिका क्षेत्रातील नवीन वापरात असलेले उड्डाणपूल, कळवा पूल, इंटरनल मेट्रो, मेट्रो लाइन ४ व ५, पीआरटीए यासारख्या मोबिलीटी इन्फ्रास्ट्रक्चरचा शहराच्या वाहतुकीवर होणारा प्रभाव, सद्यस्थितीतील शहरातील वाहतूक, वाहनांची संख्या, त्यामुळे होणारा वाहतुकीवरील परिणाम व त्यासाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना यासाठी वाहतुकीचे सर्व्हेक्षण हे मायक्रोसिम्युलेशनच्या आधारे करण्यात येणार आहे.
त्यानुसार आता यामध्ये प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी अद्ययावत वाहतूक सर्व्हेक्षणाचा डाटा संकलन, ओरिजिनी - डेस्टिनेशन, सर्व्हे, व्हीडीओग्राफीच्या माध्यमातून ट्रॅफिक व्हॉल्यूम काउंट, ट्रॅव्हल टाईम, सिम्युलेशन, कॉरिडोर - इंटर सेक्शन व इन्फ्रास्ट्रक्टचर इंन्टरव्हेन्शन आणि कॅपिसिटी बिल्डिंग करणे आदींचा समावेश यात असणार आहे. परंतू, चार वर्षापूर्वी सर्व्हे केल्यानंतर आता नव्याने सर्व्हे करुन पालिका काय साध्य करणार हे न उलगडलेले कोडे आहे.