भार्इंदर - मीरा-भार्इंदर शहरांतील वाहतुकीच्या नियोजनासाठी पालिकेने स्वखर्चातून नियुक्त केलेले ट्रॅफिक वॉर्डन वाहतुकीचे नियोजन न करता वाहतूक कर्मचाऱ्यांसोबत उभे राहून बेकायदेशीर वसुलीची कामे करत असल्याचा गंभीर आरोप करत त्यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षातील काँग्रेस सदस्यांनी शनिवारी पार पडलेल्या विशेष महासभेत केली.महत्त्वाच्या वाहतूक बेटासह सिग्नलच्या ठिकाणी अनेकदा वाहतूक कर्मचारी व वॉर्डन दिसून येत नाहीत. ते मोक्याच्या ठिकाणी उभे राहताना दिसतात. वाहतुकीच्या नियोजनासाठी नियुक्त केलेले ट्रॅफिक वॉर्डनदेखील उभे राहून कर्मचाºयांनी अडवलेल्या वाहनचालकांकडून बेकायदेशीर वसुली करत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला. दिवाळीच्या ऐन सणवारीत तर त्यांची लूटच सुरू असून त्याकडे वाहतूक कर्मचारी तसेच अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने या अवैध वसुलीला ऊत आल्याचा आरोप त्यांनी केला. लाल सिग्नल असतानाही अनेक वाहनचालक वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहतूक कर्मचाºयांच्या नाकावर टिच्चून भरधाव वाहने नेतात. काही मालवाहू वाहने क्षमतेपेक्षा जास्त सामान वाहून नेत असली, तरी त्यांना वॉर्डनमार्फत चिरीमिरीची वसुली करून सोडून दिले जाते. अशा बेकायदेशीर कामांसाठी वॉर्डनची नियुक्ती पालिकेकडून करण्यात आलेली नसल्याने त्यांची नियुक्ती त्वरित रद्द करा. तसेच अनेक शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांकडून रस्ता अडवला जातो. काही शाळा प्रार्थनास्थळी असल्याने तेथे होणाºया भक्तांच्या वर्दळीमुळे वाहतूककोंडी होऊन शाळेतील मुलांना व त्यांच्या पालकांना शाळेत येजा करताना जिकिरीचे ठरते. त्यामुळे वाहतूककोंडीच्या नियोजनासाठी वॉर्डनच्या नियुक्तीची मागणी जुबेर इनामदार व मर्लिन डिसा यांनी केली.आयुक्त बालाजी खतगावकर यांनी याप्रश्नी उपविभागीय पोलीस अधिकारी, वाहतूक शाखेच्या अधिकाºयांसोबत चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सभागृहास सांगितले. यावर कुठली उपाययोजना केली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
पालिकेने नियुक्त केलेले ट्रॅफिक वॉर्डन वसुलीचे काम करतात, काँग्रेसचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2018 3:25 AM