जितेंद्र कालेकर, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : घोडबंदर मार्गावर सकाळच्या वेळी मोठ्या वाहनांना बंदी असूनही शिरलेला मालवाहू ट्रेलर बंद पडल्याने या मार्गावर शुक्रवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. हा अवजड ट्रेलर क्रेनच्या साहाय्याने बाजूला करण्यात अडीच तासांचा अवधी गेला. त्यामुळे सकाळी ७ ते १०:४० या काळात ठाणे ते घोडबंदर आणि घोडबंदर ते ठाणे या दोन्ही मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. ब्रेकडाउन झालेला हा ट्रेलर बाजूला केल्यानंतर ही कोंडी फोडण्यात यश आल्याची माहिती पोलिस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी दिली.
ठाणे ते घोडबंदर मार्गावरून सकाळी ७ च्या सुमारास जाणारा हा लोखंडी केज वाहून नेणारा ट्रेलर कासारवडवली जंक्शनजवळ सहा ते सात मीटर एकच मार्गिका असलेल्या मार्गावर बंद पडला होता. तो बंद पडल्यानंतर आनंदनगर, पातलीपाडा या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. या मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्यामुळे घोडबंदर ते ठाणे या मार्गावरूनही अनेक दुचाकी आणि चारचाकी चालकांनी उलट्या दिशेने घोडबंदरकडे वाहने नेण्यास सुरुवात केली. भरीस भर हे दोन्ही मार्ग वाहनांनी तुडुंब भरल्यामुळे सर्व्हिस रोडवरूनही वाहनांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागल्या होत्या. त्यामुळे आधी ठाणे ते घोडबंदर आणि नंतर घोडबंदर ते ठाणे या मार्गांसह सेवा रस्त्यांवरही वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही वाहने ही एकाच ठिकाणी दोन तासांपेक्षा अधिक काळ उभी असल्याने ठाणे आणि घोडबंदरकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गांवर दहा ते १५ किलो मीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.कोंडीमुळे शाळकरी मुलांचे हाल-
सकाळी शाळेत जाण्याच्या आणि कामावर जाण्याच्या वेळेतच हा ट्रक कासारवडवलीतील बोटल नेकजवळ बंद पडल्याने अनेक वाहनांमध्ये शाळकरी मुले, तसेच नोकरदार वर्ग अडकल्याचे चित्र होते. कोंडीमुळे शाळकरी मुलांचे हाल झाले.चालकाविरुद्ध गुन्हा
या मार्गावरील वाहतूक साडेतीन तासांनी पूर्ववत झाली. या मार्गावर बंदी असतानाही आलेल्या प्रकाश डोरले या चालकाविरुद्ध निष्काळजीपणे वाहन चालवून वाहतुकीला अडथळा निर्माण करणे, नियम भंग करणे केल्याने भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २८१, २८५, २२३ आणि मोटार वाहन कायदा १७७ नुसार कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील पाटील यांनी सांगितले.