कल्याण : पश्चिमेतील शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना दुसरीकडे या रस्त्याला लागतच्या महंमदअली चौक ते रेल्वेस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गाच्या दुतर्फा असलेल्या पदपथांवर व्यापाºयांनी दुकानातील जादा सामान थाटले आहे. त्याचबरोबर रस्त्यावर नो-हॉकर्सच्या फलकाखालीच फेरीवाले, भाजीविक्रेत्यांनी बस्तान मांडल्याने चालायचे कुठून आणि कसे, असा प्रश्न पादचाºयांना पडला आहे.शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. परंतु, फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे रस्त्याचा अधिक भाग व्यापला जात असल्याने आयुक्त ई. रवींद्रन यांच्या कार्यकाळात झालेले रुंदीकरण एक प्रकारे निरुपयोगी ठरले आहे. रस्त्यावर फेरीवाल्यांचे अतिक्रमण कायम असताना त्यात पदपथावर व्यापाºयांनी अतिक्रमण केल्याचे चित्र शुक्रवारी दुपारी महंमदअली चौक ते रेल्वेस्थानकदरम्यान पाहायला मिळते. एकीकडे जुजबी का होईना फेरीवाल्यांविरोधात केडीएमसीच्या पथकांची कारवाई दिसत असताना येथील पदपथ व्यापाºयांना आंदण दिले आहेत का, असा सवाल एकूणच वास्तव पाहता उपस्थित होत आहे. दरम्यान, फेरीवाल्यांचे पुनर्वसन धोरण कृतीअभावी कागदावरच असून केडीएमसी प्रशासनाची यासंदर्भातील कार्यवाही सध्या थंडावल्याचे बोलले जात आहे.आयुक्तांनी किती अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कारवाई केली ?फेरीवाल्यांविरोधात कारवाईसाठी प्रभागनिहाय ‘विशेष फेरीवाला पथक’ स्थापन करण्यात आले आहे. हे पथक रात्री १० पर्यंत कार्यरत राहील, असा दावा प्रशासनाने केला होता. परंतु, फेरीवाले व व्यापाºयांचे अतिक्रमण पाहता हा दावा फोल ठरला आहे.अतिक्रमण आढळल्यास अधिकारी आणि पथकातील कर्मचारी कारवाईस पात्र ठरतील, असेही आयुक्त गोविंद बोडके यांनी आदेशात म्हटले आहे. मग, वस्तुस्थिती पाहता व्यापाºयांच्या अतिक्रमणप्रकरणी आतापर्यंत पथकातील किती अधिकारी, कर्मचाºयांवर आयुक्तांनी कारवाईचा बडगा उगारला, असा सवाल केला जात आहे.नोव्हेंबरमध्ये दुर्गामाता चौक ते महंमदअली चौक रस्ता, पदपथावरील अतिक्रमणे, दुकानांच्या वाढीव बेकायदा शेड तोडण्यात आल्या होत्या. ही कारवाई बोडके आणि अतिक्रमणविरोधी पथकाचे उपायुक्त सुनील जोशी यांच्या उपस्थितीत झाली होती.परंतु, अचानक झालेल्या कारवाईमुळे व्यापाºयांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. त्यामुळेच सद्य:स्थितीला व्यापाºयांच्या अतिक्रमणाकडे कानाडोळा होत असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे. यासंदर्भात बोडके यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.
कल्याणमध्ये दुकानदारांनी बळकावले पदपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2019 11:52 PM