मुरलीधर भवार कल्याण टर्मिनसचे रखडलेले घोडे, पाचव्या आणि सहाव्या लाइनचे अपूर्णावस्थेतील काम, कल्याण कसारा रेल्वेच्या तिसऱ्या मार्गाचे कूर्मगतीने सुरु असलेले काम, रेल्वे प्रवाशांची वाढलेली गर्दी, अशा रेल्वेच्या फसलेल्या नियोजनामुळे पावसाने जोरदार हजेरी लावल्यावर रेल्वेची यंत्रणा कोलमडून पडते, असे परखड प्रतिपादन माजी खासदार आनंद परांजपे यांनी ‘लोकमत’कडे केले. दोन दिवसांपूर्वी पावसामुळे ठाण्याच्या पुढील वाहतूक ठप्प झाली. मात्र ठाणे ते कर्जत-कसारा दरम्यान सुरु असलेली वाहतूक ही देखील अत्यंत कासवगतीने सुरु होती. ठाण्यापासून कर्जत-कसाºयाकडील वाहतुकीने मान टाकण्याचे कारण काय याबाबत परांजपे यांच्याशी साधलेला संवाद.
प्रश्न : यापूर्वी मध्य रेल्वेच्या शीव व कुर्ला रेल्वे स्थानकादरम्यान पावसाचे पाणी साचून रेल्वे सेवा ठप्प होत होती. हल्ली पावसाचे पाणी साचण्याची ठिकाणे बदलली. आता कळव्यात, ठाण्यातील रेल्वे स्थानका दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचते. त्याची काय कारणे आहेत ?पाऊस पडल्यावर रेल्वे रुळावर पाणी साचते. याचे कारण रेल्वे प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था यांच्यामध्ये समन्वयाचा अभाव आहे. रेल्वे ट्रॅकची लेव्हल खाली गेली आहे. रेल्वेच्या हद्दीत स्थानिक स्वराज्य संस्था नालेसफाई करीत नाही. तसेच रेल्वेकडूनही रेल्वेच्या हद्दीतील नालेसफाईचे काम योग्य प्रकारे केले जात नाही. त्यामुळे नाल्यातील गाळ, कचरा तसाच असतो. पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळे जोरदार पाऊस पडला की, पाणी रेल्वे ट्रकवर साचते. ठाणे, मुलुंड स्थानकावर तर चक्क पाण्याचा धबधबा तयार होतो. याला समन्वयाचा व नियोजनाचा अभाव कारणीभूत आहे.
प्रश्न : या समस्येवर नेमकी काय उपाययोजना केली पाहिजे ?ठाणे रेल्वे स्थानक हे फिडर रेल्वे स्थानक आहे. ठाण्याच्या पुढील स्थानकांत पाणी साचले तर कल्याण ते ठाणे ही रेल्वेसेवा सुरु ठेवली जाते. कल्याण ते ठाणे दरम्यान पाणी साचले तर ठाण्याच्या पुढे ठाणे-मुंबई रेल्वेसेवा सुरू ठेवली जाते. ठाणे स्थानकात फलाट नऊ व दहा याचा वापर ट्रान्स हार्बर लाइनसाठी केला जातो. फलाट दोन, तीन, चार, पाच यांचा वापर धीम्या व जलद गाड्यांसाठी केला जातो. सहा आणि सात लांब पल्ल्याच्या गाड्यासाठी होतो. कल्याणच्या दिशेने कल्याण ठाणे ही सेवा सुरु ठेवायची झाल्यास फलाटावर आणलेली गाडी पुन्हा कल्याणच्या दिशेने नेण्यासाठी रेल्वे रुळांची पुरेशी व्यवस्था नाही. रुळ वाढवलेले नाहीत. रेल्वे स्थानकवर सरकते जिने आले. तिकीटासाठी वेडिंग मशीन आल्या. पाण्याच्या मशीन लावल्या म्हणजे रेल्वे स्थानक स्मार्ट झाले, असे होत नाही. त्यासाठी रुळ वाढवले पाहिजे. एका स्थानकात आलेली गाडी दुसºया स्थानकातून लगेच परतीला सोडता आली पाहिजे. ही स्मार्ट अभियांत्रिकी व्यवस्था रेल्वेकडून करण्यात आलेले नाही. त्याचे साधे नियोजनही केलेले नाही. स्मार्ट प्रवासावर भर देत असताना नियोजनाचा स्मार्टनेस केंद्रापासून स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत भिनला नाही. पाचव्या व सहाव्या रेल्वे मार्गाचे काम रखडलेले आहे.
पर्यायी वाहतुकीचा विचार का होत नाही?कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कल्याण तळोजा मेट्रो प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ डिजिटल पद्धतीने करण्यात आला. डोंबिवलीचा प्रवासी हा मुंबईच्या दिशेने जास्त जातो. त्याचा लोड मध्य रेल्वेच्या डोंबिवली ते मुंबई दरम्यान सेवेवर आहे. त्याला डोंबिवली तळोजा हा मेट्रोचा पर्याय देणे कितपत योग्य ठरणार? नवी मुंबईतील एअरपोर्टला जाण्याकरिता ते ठीक आहे. पण अद्याप एअरपोर्ट तयार झालेले नाही. तसेच ठाणे-भिवंडी-कल्याण या मेट्रो रेल्वे प्रकल्पाचे काम ठाण्यातून सुरु झालेले दिसत असले तरी मेट्रो रेल्वेचा मार्ग हा कल्याण-मुंबई मध्य रेल्वेला समांतर हवा होता. त्यामुळे मेट्रोचे नियोजनही फसले आहे. मार्ग चुकले आहेत. ठाण्याहून कल्याण, कसारा आणि कर्जतच्या दिशेने जाणाºया प्रवाशांचा लोंढा मोठा आहे. हा प्रवासी मेट्रोने भिवंडीला वळसा मारुन का जाईल. तो मध्य रेल्वेने प्रवास करणेच पसंत करेल. पर्यायी वाहतूक हा रस्ते मार्ग होऊ शकतो. मात्र रस्ते मार्गात पुलांचे प्रकल्प काही ठिकाणी रखडले आहेत काही ठिकाणी अत्यंत संथ गतीने सुरु आहेत. त्यामुळे सगळीकडे वाहतूक कोंडी आहे. विद्यमान मंत्री व लोकप्रतिनिधी रस्त्याऐवजी रेल्वेने मुंबईला जाणे पसंत करतात. नियोजनकर्त्यांवर ही वेळ यावी, यापेक्षा आणखी दुर्दैव काय असू शकते? डोंबिवली मोठा गाव ठाकुर्ली ते माणकोली हा माझ्या कार्यकाळात मंजूर झालेला पूल अद्याप पूर्ण झालेला नाही.