डोंबिवली : उपनगरी रेल्वे प्रवासी महासंघाच्या पाठपुराव्याने १५ ऑगस्टपासून महाराष्ट्र शासनाने कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या सामान्य प्रवाशांना लोकल प्रवास खुला केला. मात्र, पात्र प्रवाशांना दैनिक तिकिटे न देता फक्त मासिक पास द्यावेत, अशा सूचना राज्य शासनाने रेल्वेला दिल्या. लोकल २४ तास सर्वांसाठी खुल्या करत नसाल तर आणखी काही काळासाठी तिकीट सेवा आणि सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यंत लोकल प्रवासाची पुन्हा मुभा द्यावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष मनोहर शेलार यांनी राज्य शासनाकडे बुधवारी केली.
साठ वर्षे वयाची व्यक्ती ही सेवानिवृत्त झालेली असते. त्यांना पेन्शनच्या कामासाठी, दवाखान्यात जाण्यासाठी जेमतेम चार-सहा वेळा लोकल प्रवास करावा लागताे. अशा व्यक्तींना हे सरकार पास काढा आणि बिनकामाचे लोकलने फिरा आणि कोरोना पसरवा असे सांगत आहे. मुळात ज्येष्ठ नागरिकांना मासिक पास सक्ती करणे हा सरकारचा निव्वळ मूर्खपणा आहे. त्यांना तिकीट सुविधा द्यायला हवी. आता लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवास खुला केला आहे, तर पात्र प्रवाशांस तिकीटही उपलब्ध करून द्या, अशा सूचना रेल्वेला राज्य सरकारने करायला हव्यात. तिकीट मिळत नसल्याने रेल्वे कर्मचारी, सामान्य प्रवाशांत खटके उडतात. प्रसंगी भांडणे होतात. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती दाखवून लोकांना घाबरवणे राज्य सरकारने थांबवावे. दोन डोस घेतलेल्या पात्र प्रवाशाला पास, दैनिक तिकीट दोन्ही मिळावे, असे ते म्हणाले. या मागण्यांसंदर्भात महासंघातर्फे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आपत्ती व्यवस्थापनमंत्री विजय वडेट्टीवार आदींना पत्र देण्यात येणार असल्याचे शेलार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले.