कल्याण : केडीएमसीकडून बुधवारी महिला आणि तरुणींना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. मात्र, आधीच रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यातच हे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याने नागरिकांकडून त्यावर टीका होत आहे.केडीएमसीच्या महिला व बालकल्याण समितीतर्फे महापौर विनीता राणे यांच्या उपस्थितीत बुधवारी चिकणघरमधील शंकर पॅलेस येथे अल्प उत्पन्न गटातील महिला व मुलींना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यावेळी फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षणही दिले जाणार आहे. महिला बालकल्याण समितीने घेतलेला हा कार्यक्रम स्तुत्य असला तरी सध्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली चाळण व त्याकडे झालेले दुर्लक्ष पाहता विरोधकांनी प्रशासनावर उपहासात्मक टीका करण्यास सुरुवात झाली आहे.खड्डे भरण्याचे काम बांधकाम विभागाशी निगडित आहे. एकीकडे खड्डे भरण्याची कामे संथगतीने सुरू असताना दुसरीकडे खोदकामांचे सत्रही सुरूच आहे. याचाही त्रास वाहनचालक आणि पादचाऱ्यांना होत आहे. सध्या बहुतांश रस्ते खड्ड्यांत आहेत. हे खड्डे तत्परतेने भरावेत आणि वाहन चालविण्याचे प्रशिक्षण द्यावेत, अशीही चर्चा वाहनचालकांमध्ये सध्या सुरू आहे. दरम्यान, वाहन चालविण्याच्या प्रशिक्षणाचा घेतलेला कार्यक्रम हा राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार घेतल्याची प्रतिक्रिया महिला बालकल्याण विभागाचे उपायुक्त मिलिंद धाट यांनी ‘लोकमत’ला दिली.>‘त्यासाठी’ बहुतेक प्रशिक्षण असावेमोठ्या प्रमाणात निधी खर्चूनही केडीएमसी प्रशासनाला आणि सत्ताधाऱ्यांना चांगले रस्ते देता आलेले नाहीत. खड्डे जैसे थे राहिल्याने अशा खड्ड्यांमधून वाहने चांगल्या पद्धतीने कशी चालवायची, यासाठी बहुधा महिला बालकल्याण विभागाने प्रशिक्षण कार्यक्रम घेतला असावा, असा टोला मनसेचे गटनेते मंदार हळबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना लगावला.
खड्ड्यांतून वाहन चालवण्याचे प्रशिक्षण?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2019 1:25 AM