सुरेश लोखंडे, ठाणे : सध्या सुरू असलेल्या या पावसाळ्यात संभाव्य साथीचे आजार डाेके वर काढण्याचे शक्यता आहे. त्यावर वेळीच मात करण्यासाठी जिल्हा परिषदेने अतिसार प्रतिबंधक अभियान हाती घेतले आहे. त्यास अनुसरून भिवंडी तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या जलसुरक्षकांची कार्यशाळा घेऊन त्यात त्यांना विविध स्वरूपाचे धडे देऊन मार्गदर्शन करण्यात आले.
अतिसार प्रतिबंधक अभियानांतर्गत सुरू असलेली माेहीम यशस्वी करण्यासाठी सर्व जलसुरक्षकांनी विविध पाणी नमुने घेण्याच्या चाचण्या आणि गाव स्तरावर जलसुरक्षक यांच्या कर्तव्य, जबाबदाऱ्या याबाबचे सखाेल मार्गदर्शन या कार्यशाळेचे उद्घाटन प्रकल्प संचालक अतुल पारसकरयांनी केले. या कार्यशाळे निमित्त घेतलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी डॉ. प्रदीप घोरपडे आदी उपस्थित हाते. या मोहीम कालावधीत पाणी गुणवत्तेबाबत जास्तीत जास्त गावातील लोकांची जाणीव जागृती करण्याबाबत जलसुरक्षक यांना योग्य त्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी रासायनिक पाणी नमुने तपासणीच्या सर्व चाचण्या कशा पद्धतीने पूर्ण करावे व जैविक पाणी नमुने चाचण्या कशा पद्धतीने पूर्ण करावे याबाबत सखोल मार्गदर्शन बेलापूर येथील केमिस्ट विभागीय सनियंत्रण कक्षाचे सचिन तारमाळे यांनी केले. आरोग्य पर्यवेक्षक दिलीप जाधव यांनी गावातील लोकांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी कसे देता येईल याबाबत योग्य ते मार्गदर्शन केले. या कार्यशाळेचा समारोप भिवंडी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे यांनी केले.