कसारा : महामार्गावर अपघात झाल्यास जखमींना तत्काळ मदत मिळावी यासाठी मृत्युंजय दुतांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांना आपत्कालीन प्रसंगी परिस्थिती कशी हाताळावी, याबाबत कसारा येथे मंगळवारी प्रशिक्षण देण्यात आले. रेझेलियंट फाउंडेशन, पालघर या संस्थेचे भूपेंद्र मिश्रा, युगंधरा काजारे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी हे प्रशिक्षण दिले. यावेळी ३५ मृत्युंजय दूत, महामार्ग पोलीस, आपत्ती व्यवस्थापन टीमच्या सदस्यांनी प्रशिक्षण घेतले.
अप्पर पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक दिगंबर प्रधान, पोलीस उपअधीक्षक भागडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्ग पोलीस यांच्या वतीने हे शिबिर पार पडले. महामार्ग पोलीस केंद्र शहापूरचे प्रभारी अधिकारी राकेश डांगे, पोलीस केंद्र घोटीचे प्रभारी अधिकारी अमोल वालझडे व महामार्ग पोलिसांसह आपत्ती व्यवस्थापन ग्रुप कसाराचे अध्यक्ष श्याम धुमाळ यांच्यासह दत्ता वाताडे, सुनील कनकोसेे, विनोद आयरे, सनी चिले, अक्षय राठोड, प्रसाद दोरे, सुनील वाकचौरे सहभागी झाले होते. त्यांना अपघातानंतरची परिस्थिती हाताळणी, जखमींवरील प्रथमाेपचार, आदींचे प्रशिक्षण देण्यात आले. तसेच प्रात्यक्षिक दाखवून कार्यशाळेस उपस्थित सदस्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. कृत्रिम श्वासाेच्छ्वास, जखमींची हाताळणी, रक्तप्रवाह बंद करणे, आग कशा प्रकारे आटाेक्यात आणावी, याचे प्रशिक्षण देण्यात आले.