अंबरनाथ : अंबरनाथ दी एज्युकेशन सोसायटीच्या वतीने शहापूर तालुक्यातील अंदाड गावातील माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांसाठी उन्नती कौशल्य विकास योजनेअंतर्गत शिवणकला प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात विद्यार्थ्यांना शिवणकलेचे प्रशिक्षण घेता येणार आहे.
सी.के. पी. समाज अंबरनाथ यांच्या आर्थिक सहकार्याने आणि विवेकानंद सेवा मंडळ, डोंबिवली यांच्या विशेष प्रयत्नाने आणि धनश्री फाउंडेशन यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी 'उन्नती कौशल्य विकास’ योजने अंतर्गत शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन झाले. ग्राम मंडळाचे माजी अध्यक्ष अरुण मोगरे व धनश्री फाउंडेशनच्या सुवर्णा महामुनी यांच्या हस्ते करण्यात आले. या उपक्रमासाठी सी.के.पी. समाज अंबरनाथचे अध्यक्ष राजन कर्णिक यांनी समाज मंडळातील सभासद आणि स्नेही मित्र परिवार यांच्यामार्फत एक लाखाचे अर्थसहाय्य उपक्रमासाठी दिले. या निधीतून ४ शिलाई, १ बिडींग मशीन घेण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचा खर्च आणि आवश्यक सर्व साहित्यदेखील समाजामार्फत देण्यात येणार आहे.
आदिवासी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध व्हावा, या उद्देशाने सदर उपक्रम सुरू केल्याचे कर्णिक यांनी सांगितले. या उपक्रमात विद्यार्थ्यांना मास्क, पिशवी आणि भविष्यात शालेय गणवेश शिवण्याचे प्रशिक्षण देणार आहोत, असे सुवर्णा महामुनी यांनी सांगितले. भविष्यात मोबाईल रिपेरिंगसारखे कोर्स सुरू करण्याचा मंडळाचा प्रयत्न असेल असे, विवेकानंद सेवा मंडळाचे रवींद्र वारंग यांनी सांगितले. यावेळी मुख्याध्यापिका दीपिका विशे, नितीन देव, सुवर्णा हरड, सुरेश मोरे, पोलीस पाटील सचिन गायकवाड, वीला साबळे, तृप्ती देसाई उपस्थित होते.
-----------------------