ठाणे : स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या नौपाडा परिसरात कुठेही कशीही वाहने उभी करण्याची परंपरा कायम आहे. या ठिकाणी वाहतूक सुरळीत करण्यासाठी अनेक बदलही यापूर्वी झालेले आहेत. परंतु, तरीदेखील येथील कोंडी फारशी सुटू शकलेली नाही. यावर उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी एक योजना पुढे आणली आहे. त्यानुसार, येथील पार्किंग पी-१ व पी-२ अशी करून रस्त्याच्या एकेका बाजूला ठरावीक वेळेपर्यंत पार्किंगची मुभा दिली जाणार आहे. या ठरवून दिलेल्या वेळेत वाहन काढले नाही, तर त्यावर कारवाई करण्याचे सूतोवाचही केले आहे.नौपाड्यात वाहतुकीसाठी गोखले मार्ग महत्त्वाचा मानला जातो. तसेच शहरातील व्यावसायिक केंद्र म्हणूनही मार्ग ओळखला जातो. या मार्गावर काही वर्षांपासून वाहनांचा भार वाढल्याने राममारुती रोड, मल्हार सिनेमा, शाहू मार्केट, गजानन वडापाव रस्ता आदी ठिकाणी वाहतूककोंडी होते. या मार्गावर दुचाकी वाहनांसाठी सम-विषम अशी पार्किंगची व्यवस्था ठिकठिकाणी केली आहे. परंतु, व्यापारी तसेच ठाणे स्थानकातून रोज कामानिमित्त प्रवास करणारे अनेक प्रवासी येथील पार्किंगमध्ये दिवसभर वाहने उभी करतात. त्यामुळे याठिकाणी कामानिमित्त येणाºया अनेकांना वाहने उभी करण्यासाठी पुरेशी जागा मिळत नसल्याने ते रस्त्यावर इतरत्र वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूककोंडीत अधिक भर पडते.आताही कोंडी फोडण्यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी पार्किंग पी-१ व पी-२ अशी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, सकाळी ७ ते ३ या वेळेत रस्त्याच्या उजव्या बाजूला, तर दुपारी ३ ते रात्री १२ या वेळेत रस्त्याच्या डाव्या बाजूला वाहने उभी करण्यात येणार आहेत. यापूर्वीही असाच काहीसा नियम केवळ गोखले रस्त्यासाठी घेतला होता. परंतु व्यापारी, स्थानिक रहिवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेतल्याचे आरोपही पोलिसांवर झाले होते. मात्र, आता हाच निर्णय कायम करण्याच्या हालचाली पोलिसांनी सुरूकेल्या असून संपूर्ण नौपाडा परिसरच यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात, ठाणे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अशा प्रकारे बदल करण्याचे प्रयोजन असल्याचे सांगून तसा सर्व्हेदेखील झाल्याचे स्पष्ट केले. या सर्व्हेनुसार रस्त्यांवर नेमकी कुठे पार्किंगची व्यवस्था करायची, याचा अभ्यास अंतिम टप्प्यात आला आहे.
नौपाड्यातील वाहतूककोंडीवर पी-१, पी-२ चा उतारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:01 AM