ठाणे : अवघ्या दोन दिवसांपूर्वीच केलेल्या ठाणे महापालिकेतील उपायुक्त आणि सहायक आयुक्तांच्या घाऊक बदल्या रद्द करण्याची नामुश्की ठामपा आयुक्तांवर ओढवली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे प्रशासनाला बदल्यांचे आदेश मागे घ्यावे लागल्याची चर्चा अधिकारी-कर्मचारी वर्तुळात आहे.
आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तब्बल पाच वर्षांनंतर महापालिकेतील उपायुक्त मनीष जोशी, अशोक बुरपुल्ले, संदीप माळवी आणि वर्षा दीक्षित यांच्या अंतर्गत बदल्या करून खात्यांचेही वाटप केले होते. मात्र, याबाबत राज्याचे नगरविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महापौर नरेश म्हस्के यांनीही नाराजी व्यक्त केल्यानंतर आयुक्तांनी आपला बदलीआदेश मागे घेतला. मात्र तीन वर्षांत बदली करण्याबाबत काढण्यात आलेल्या शासन आदेशास या दबावतंत्रामुळे ठाणे महानगरपालिकेत हरताळ फासला गेला आहे.विश्वासात न घेता या बदल्या केल्यामुळे अधिकारी आणि लोकप्रतिनिधींमध्ये संतापाचे वातावरण होते. बदल्या करताना पक्षपात झाल्याची कुजबुजही अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये होती. दोन दिवसांपूर्वी बदली झालेल्या या अधिकाºयांमध्ये नौपाडा-कोपरी प्रभाग समितीचे सहायक आयुक्त मारुती गायकवाड यांची मुंब्रा सहायक आयुक्तपदी, महेश आहेर यांची वागळे प्रभाग समिती सहायक आयुक्तपदी, वागळेचे सहायक आयुक्त विजय जाधव यांची स्थावर मालमत्ता विभागात, उथळसर समितीचे सहायक आयुक्त शंकर पाटोळे यांची नौपाडा आणि सामान्य प्रशासनाच्या प्रणाली घोंगे यांची उथळसर प्रभाग समितीवर सहायक आयुक्तपदी बदली करण्यात आली होती.शासन आदेशास ठाणे पालिकेचा हरताळया बदल्या करताना स्थानिक अधिकाºयांना लक्ष्य केले जात आहे. प्रतिनियुक्तीवर आलेले ओमप्रकाश दिवटे हे गेली तीन वर्षे एकाच विभागात कार्यरत आहेत. त्यांची बदली का नाही केली, असा सवाल या अधिकाºयांनी उपस्थित केला होता. प्रशासनाने प्रशासकीय कामकाजाकरिता या बदल्या केल्या होत्या.महापालिका आयुक्तांनी बदल्या रद्द केल्यामुळे हा वाद मिटल्याची चर्चा आहे. मात्र, तीन वर्षे एका विभागात कोणत्याही अधिकाºयास ठेवू नये, या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रात काढलेल्या शासन आदेशास महापालिका प्रशासनाने पुन्हा एकदा खाडीत बुडवले आहे.पालकमंत्र्यांसह महापौरांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आयुक्तांनी सोमवारी बदल्यांच्या आदेशात थोडेसे बदल केले. परंतु, महापौरांनी नाराजी व्यक्त करून बदल्या रद्द करण्याची सूचना आयुक्तांना केली. त्यानुसार सायंकाळी जयस्वाल यांनी बदल्यांचे दोन्ही आदेश रद्द केले.