ठाणे : ठाणे शहराची मागील दोन दशकांत प्रचंड झालेली लोकसंख्या वाढ, त्यामुळे दररोज रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडत असलेल्या घटना तसेच रेल्वे प्रवाशांच्या जागेअभावी अपुऱ्या पडणाऱ्या सोयीसुविधा, याकरिता ठाणे महानगरपालिकेने ठाणे रेल्वेस्थानकाच्या विस्तारासाठी राज्यपालांची भेट घेतली. ठाणे-मुलुंड दरम्यान ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेवर नवीन रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची जागा महानगरपालिकेस हस्तांतरित प्रक्रियाला गती मिळावी, यासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची शनिवारी रात्री ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनी राजभवनावर जाऊन भेट घेतली, व त्यांना पत्राद्वारे निवेदन दिले.
भारतातील पहिली रेल्वे बोरीबंदर ते ठाणे या सुरू झालेल्या ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्टेशनला 166 वर्षे पूर्ण झाली आहेत त्यामुळे या ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज 7 ते 8 लाख प्रवासी रोज ये-जा करीत असतात ठाणे-मुलुंड दरम्यान दिवसाला 4 ते 5 प्रवासी गर्दीमुळे रेल्वेतून पडून मृत्युमुखी पडतात. तर मध्य रेल्वेवर दिवसाला 12 जण मृत्युमुखी पडतात, गेल्या 5 वर्षात अंदाजे 3 हजार प्रवासी मृत्युमुखी पडलेले आहेत. त्यामध्ये ठाणे-मुलुंड दरम्यान मृत्युमुखी पडण्याच्या घटना अधिक असल्याने ठाणे-मुलुंड दरम्यान नवीन विस्तारित ठाणे रेल्वे स्थानकाच्या निर्मितीसाठी ठाणे महानगरपालिकेने रेल्वे रुळालगत असलेली ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयच्या 63 एकर जागेपैकी 14.83 एकर जागा द्यावी. ठाणे महानगरपालिकेस सार्वजनिक आरोग्य विभागाकडून हस्तांतरित करण्यास विलंब लागत असल्याने आपण यासंदर्भात दखल घेऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिवांमार्फत ही जागा लवकर हस्तांतरीत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी खासदार राजन विचारे यांनी राज्यपालांकडे केली.
या प्रस्तावाला तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांच्याकडून सन 2017 ला मंजुरी मिळाली आहे. तसेच या नवीन रेल्वेस्थानकासाठी मनोरुग्णालयाची जागा मिळविण्यास महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाचीही मंजुरी मिळाली आहे. केंद्राच्या स्मार्ट सिटी अंतर्गत या प्रकल्पासाठी 289 कोटी इतकी रक्कम ठाणे महानगरपालिकेच्या स्मार्ट सिटीकडे वर्गही करण्यात आली आहे. ठाणे महानगरपालिकेने निविदा करून या स्थानकाच्या भूमी परीक्षणाचे कामही सुरू झाले आहे. परंतु, या जागा हस्तांतरीत प्रक्रियेस विलंब लागत असल्याने रेल्वे रुळाच्याकामासाठी रेल्वेकडे पैसे वर्ग करता येत नाही, याची खंत राज्यपालांशी चर्चा करताना खासदार राजन विचारे यांनी व्यक्त केली. एलफिस्टन रोडवर झालेल्या दुर्देवी घटनेची पुनरावृत्ती ठाणे स्थानकात होऊ नये, यासाठी संपूर्ण ठाणेकर या नवीन रेल्वेस्थानकाच्या प्रतीक्षेत आहेत. यामुळे ठाणे रेल्वे स्थानकातील 31 टक्के व मुलुंड रेल्वे स्थानकातील 24 टक्के प्रवाशांचा भार कमी होणार आहे हेही विचारे यांनी राज्यपालांना पटवून दिले.