उल्हासनगर: महापालिकेत वर्ग-१ व २ ची ८० टक्के पेक्षा जास्त पदे रिक्त असतांना ३ वर्ष पूर्ण झालेल्या तीन अधिकाऱ्यांची निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार बदली झाली. आयुक्त अजीज शेख यांनी बुधवारी बदली झालेले उपआयुक्त अशोक नाईकवाडे, प्रियंका राजपूत व सहायक लेखा अधिकारी दिपक धनगर यांना निरोप देण्यात आला आहे.
उल्हासनगर महापालिकेत वर्ग-१ व २ च्या अधिकाऱ्यांचा वानवा असल्याने, लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्यांवर वर्ग-१ व २ च्या पदाचा पदभार देण्यात आला. अतिरिक्त आयुक्त, २ उपायुक्त, ६ सहायक आयुक्त, शहर अभियंता, पाणी पुरवठा व बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, कर निर्धारक आदी महत्वाचे पदे रिक्त असून शासनाकडे प्रतिनियुक्तीवर पाठविण्याचे पत्र शासनाला महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी अनेकदा दिले आहे.
दरम्यान मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे, प्रियांका राजपूत यांना ३ वर्ष झाल्याने, निवडणूक आयुक्तांच्या आदेशाने त्यांच्या बदल्या झाल्या आहे. तर सहायक लेखा अधिकारी दिपक धनगर यांची पदोन्नतीने बदली झाल्याचे सांगण्यात आले. तिन्ही अधिकाऱ्यांना महापालिका सभागृहात आयुक्त अजीज शेख व अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या हस्ते निरोप देण्यात आला. यावेळी उपायुक्त सुभाष जाधव, मुख्य लेखा अधिकारी किरण भिलारे, शहर अभियंता संदीप जाधव, महापालिका सचिव प्रतिभा कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, सहायक आयुक्त गणेश शिंपी, सहायक सार्वजनिक अधिकारी मनीष हिवरे यांच्यासह विभाग प्रमुख, कर्मचारी आदीजन उपस्थित होते.