ठाणे : कोरोना व्हायरसचा प्रार्दभाव रोखण्यासाठी ठाणे महापालिकेने जांभळी नाक्यावरील मंडई सेंट्रल मैदान येथे स्थलांतरीत केली होती. मात्र येथेही सोशल डिस्टेन्टसचा नियम पाळला जात नसल्याने अखेर अवघ्या दोनच दिवसात येथील भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांचे आता जांभळी नाक्यावरील तीन रस्त्यांवर स्थलांतर करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार शुक्रवार पासून येथील तीन रस्त्यांवर त्यांना विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. जांभळी नाका ते स्टेशन पर्यंत आणि जांभळी नाक्यावरील दोन भाजी मंडईत गर्दी ही कोरोनाला आमंत्रण देण्यासारखीच होती. त्यामुळे येथील ४०० भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांचे स्थलांतर पालिकेने बुधवार पासून सेंट्रल मैदानात केले होते. परंतु, बुधवारी काही प्रमाणात तेथे गर्दी दिसून आली. मात्र गुरुवारी या ठिकाणी नागरीकांनी सोशल डिस्टेन्टसचा कोणताही नियम पाळला नसल्याचेच दिसून आले. पोलिस आणि पालिकेचे अधिकारी आवाहन करुनही नागरीक याला हरताळ फासतांनाच दिसत होते. त्यामुळे आता काय करावे असा प्रश्न पालिकेला पडला होता. त्यानुसार गुरुवारी पुन्हा या संदर्भात बैठक घेऊन यावर दुसरा पर्याय पालिकेने पुढे आणला आहे. त्यानुसार जांभळी नाका भागातील तीन रस्ते आता यासाठी ठेवण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार आता येथील सुभाष पथ, शिवाजी पथ आणि चितांमणी चौकातील रस्ते यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार पालिकेने गुरुवारी या तीनही रस्त्यांवर मार्कींग करण्याचे काम सुरु होते. तर या रस्त्याच्या दोनही बाजूला भाजी विक्रेते आणि फळ विक्रेत्यांना बसविले जाणार आहे. तसेच नागरीकांनी सोशल डिसेन्टीसींगचा नियम पाळावा असे आवाहनही पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याशिवाय गरज असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहनही पालिकेने केले आहे. दरम्यान आता शुक्रवारपासून या तीनही रस्त्यांवर पहाट पाच ते सकाळी १० वाजेपर्यंत भाजी विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
सेंट्रल मैदानातून पुन्हा भाजी मंडईचे स्थलांतर, तीन रस्त्यांवर आता भरणार मंडई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2020 2:33 PM