मीरा रोड : मीरा-भाईंदर पालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागात तब्बल २५ वर्षांपेक्षा जास्त काळ ठाण मांडलेले वजनदार कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांची जानेवारीत पाणीपुरवठा विभागात झालेली बदली रद्द केली. मात्र, सहा महिन्यांतच खांबित यांची पुन्हा सार्वजनिक बांधकाम विभागात झालेली बदली शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. २०११ पासून पाणीपुरवठा विभागात कार्यकारी अभियंता असलेले सुरेश वाकाेडे यांची बांधकाम विभागात बदली झाली हाेती. आता तेही पुन्हा पाणीपुरवठा विभागात परतले आहेत.
बदली करण्याचा हा निर्णय आयुक्त डॉ. विजय राठोड यांच्या कार्यकाळात जानेवारीमध्ये झाला हाेता. मीरा-भाईंदर नगर परिषद असतानापासून कार्यरत असलेली खांबित हे महापालिकेतील वजनदार अधिकारी मानले जातात. राठोड यांची बदली होऊन आयुक्तपदी दिलीप ढोले यांची नियुक्ती झाली. ढोले यांनी मंगळवारी २७ जुलैला आदेश काढून खांबित यांची पुन्हा बांधकाम विभागात, तर वाकोडे यांची पुन्हा पाणीपुरवठा विभागात बदली केली आहे. याआधी पालकमंत्री असताना गणेश नाईक यांनी खांबित यांच्या बदलीचे आदेश दिले होते. तेव्हाही त्यांची पाणीपुरवठा विभागात बदली केली हाेती. पण, खांबित त्या विभागात हजरच झाले नाहीत. त्यानंतर काही दिवसांतच त्यांनी बदली रद्द करून बांधकाम विभाग मिळवला हाेता. २००८ मध्ये नगरसेवक चंद्रकांत वैती यांनी खांबित यांच्याविरोधात आघाडी उघडून सेवेतून निलंबित करण्याचा ठराव मंजूर करून घेतला. मात्र, पुढच्या सभेत काही नगरसेवकांनी खांबित यांना पुन्हा सेवेत घेण्याचा ठराव केला होता.
अजित मुठेंकडे आराेग्य विभाग
१५ वर्षांपेक्षा जास्त सार्वजनिक आरोग्य विभाग सांभाळणारे उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे यांच्याकडून आयुक्तांनी सार्वजनिक आरोग्य विभाग काढून घेत तो उपायुक्त अजित मुठे यांच्याकडे दिला आहे. तर पानपट्टे यांना परिवहन विभागाचे स्टेअरिंग दिले आहे. तर मुठे यांच्याकडील अतिक्रमण विभाग नवनियुक्त उपायुक्त मारुती गायकवाड यांना दिला आहे.