सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिकेच्या विविध विभागात वर्षानुवर्षे ठाण मांडून बसणाऱ्या ५५ पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांच्या आयुक्तांनी मंगळवारी बदल्या केल्या. या आदेशाने मक्तेदारी निर्माण करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दणका बसला आहे.
उल्हासनगर महापालिकेतील विविध विभागात राजकीय वरदहस्तमुळे व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने वर्षानुवर्षे ठाण मांडणाऱ्या तब्बल ५५ पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या बदलीचे आदेश मंगळवारी आयुक्तांच्या आदेशाने काढण्यात आले. या आदेशाने ठाण मांडून बसणाऱ्या कर्मचाऱ्यांना आयुक्त विकास ढाकणे यांनी जोर का धक्का दिला. अधीक्षक असलेल्या सलोनी निमकर, रोखपाल असलेले उमेश हजारे, लेखा परीक्षक बेबी माळी यांच्यासह एकून ६ वरिष्ठ लिपिक, एकून २९ लिपिक यांच्यासह सुरक्षारक्षक, सफाई कामगार, मजूर, शिपाई आदी कर्मचाऱ्यांचा बदली मध्ये समावेश आहे.
महापालिका कारभार पारदर्शक व सर्वसमावेशक होण्यासाठी आयुक्त विकास ढाकणे यांनी जनसंवाद सभेचे आयोजन केले. त्यासाठी प्रभाग अधिकारी ऐवजी सहायक आयुक्त असलेल्या अधिकाऱ्यांची मुख्य जनसंवाद अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. या नियुक्तीने प्रभाग समिती कार्यालयात काय चालले आहे. हे उघड होऊन प्रभाग अधिकाऱ्यावर नियंत्रण ठेवता येणार आहे.
प्रभारी अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी महापालिकेत वर्ग-१ व २ ची पदे रिक्त असल्याने, लिपिक दर्जाच्या कर्मचाऱ्याकडे या पदाचा प्रभारी पदभार तत्कालीन आयुक्तांनी दिला. त्यातील बहुतांश कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात सापडलेले आहेत. तेही अधिकारी वर्षानुवर्षे एकाच पदावर ठाण मांडून बसल्याने, त्यांची त्या विभागात मक्तेदारी निर्माण झाली. अश्या कर्मचाऱ्यांना मूळ पदावर बदली करून त्याची मक्तेदारी मोडीत काढण्याची मागणी होत आहे.