- अनिकेत घमंडीडोंबिवली - मुंबईसह राज्यात सर्वत्र पोलीस निरीक्षकांच्या बदली सत्राची चर्चा सुरू असतानाच लोहमार्ग पोलीस नरीक्षकांच्याही बदलीचे आदेश लोहमार्ग आयुक्त रवींद्र शिसवे यांनी सोमवारी दिले. त्यामध्ये प्रामुख्याने ठाणे जिल्ह्यातील ठाणे, डोंबिवली, कल्याण आणि कर्जत या चारही पोलीस ठाण्यातील निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. त्यातही अद्याप डोंबिवली लोहमार्ग पोलीस ठाण्याची जबाबदारी त्याच पोलीस ठाण्यातील क्राईम पीआय यांच्याकडे देण्यात आली. बदली झाली त्यामध्ये ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांना कल्याणचा चार्ज, कल्याणचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांना कर्जत, कर्जतचे पोलीस निरीक्षक संभाजी यादव यांना कुर्ला, डोंबिवली - कल्याणच्या प्रभारी पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने यांना ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचा चार्ज तसेच डोंबिवलीचा चार्ज पोलीस निरीक्षक किरण उंदरे यांना देण्यात आला.
वर्षभरआधी दुसाने यांची नेमणूक डोंबिवलीसाठी झाली होती, मात्र मध्यंतरी त्यांना काही महिन्यांपूर्वी तांत्रिक मुद्यांमुळे कल्याणचा प्रभारी म्हणून अतिरिक्त कार्यभार देण्यात आला होता. त्यामुळे एवढ्यात बदल्या होतील अशी शक्यता दुसाने यांना नव्हती, परंतु अन्य पोलीस अधिकाऱ्यांना अपेक्षेप्रमाणे बदल्या झाल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे पोलीस अधिकारी वर्तुळात त्या बदल्यांची चर्चा नसली तरी वरिष्ठ पोलीस अधिकारी कोण आले आहेत, त्यांचा स्वभाव, काम करण्याची पद्धत कशी आहे याबाबतची जोरदार चर्चा पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे. संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी मंगळवारपासून बदली पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारल्याचे सांगण्यात आले.