उल्हासनगर : महापालिका प्रभाग समिती क्रं-४ चे प्रभाग अधिकारी महेंद्र पंजाबी यांच्यासह तिघा जनावर लाच घेण्याचा गुन्हा दाखल झाल्यावर, आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. महेंद्र पंजाबी यांची प्रभाग अधिकारी पदावरून उचलबांगडी केली असून त्यांच्या जागी प्रभाग समिती क्रं-१ चे साहाय्य आयुक्त गणेश शिंपी यांची नियुक्ती केली आहे.
उल्हासनगर महापालिका प्रभाग समिती क्रं-४ चे सहायक आयुक्त तथा प्रभाग अधिकारी महेंद्र पंजाबी, मुकादम रतन जाधव व विकास जाधव यांच्यावर हिललाईन पोलीस ठाण्यात लाच घेतल्याचा गुन्हा दाखल झाला. याप्रकारने महापालिका व प्रभाग समिती कार्यालयातील सावळागोंधळ उघड झाला. लाचेच्या गुन्ह्याप्रकरणी महापालिकेला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अहवाल आल्यावर, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यावर निलंबनाच्या कारवाईचे संकेत आयुक्त अजीज शेख यांनी दिले. दरम्यान गुरुवारी आयुक्तांनी प्रभाग अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या असून यापुढे गैरप्रकार खपवून घेतला जाणार नसल्याचा दम अधिकाऱ्यांना आयुक्तांना दिल्याचें समजते.
महापालिका प्रभाग समिती क्रं-१ चे सहायक आयुक्त गणेश शिंपी यांची प्रभाग समिती क्र-४ च्या सहायक आयुक्त पदी तर प्रभाग समिती क्र-३ चे सहायक आयुक्त अजित गोवारी यांची प्रभाग समिती क्र-१ पदी सहायक आयुक्त पदी बदली करण्यात आली. तर भांडार विभाग प्रमुख पदी असलेले दत्तात्रय जाधव यांची प्रभाग समिती क्र-३ च्या सहायक आयुक्त पदी नियुक्ती केली. अतिरिक्त आयुक्त करुणा जुईकर यांचे स्वीय सहायक अंकुश कदम यांची भांडार विभाग प्रमुख पदी बदली करण्यात आली. सहायक आयुक्त गणेश शिंपी यांच्याकडे अतिक्रमण प्रमुख ही जबाबदारी कायम राहणार आहे. मोडकळीस आलेल्या बांधकामाला परवानगी देण्याच्या नावाखाली लाच घेणाऱ्या सहायक आयुक्त महेंद्र पंजाबी यांच्यासह प्रभाग समिती क्र-४ मधील लाचखोर कर्मचाऱ्यांची महापालिकेने कार्यालया अंतर्गत चौकशी करण्याची मागणी होत आहे.
रस्ता रुंदीकरणांचा नावाखाली बांधकामे कॅम्प नं-५ स्वामी प्रकाश शाळे समोरील रस्त्याचे रुंदीकरण महापालिकेने केले. मात्र रस्ता रुंदीकरणांचा नावाखाली बहुमजली व बाधित न झालेल्या दुकानाची अवैध कामे बिनधास्त सुरू आहेत. आदींच्या तक्रारी प्रभाग समिती क्रं-४ च्या कार्यालयाकडे आल्या आहेत. रस्ता रुंदीकरणांच्या आड अवैध व वाढीव बांधकाम करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.