- सदानंद नाईक
उल्हासनगर : द्वारलीपाडा येथील तृतीयपंथीया साठी बांधण्यात आलेल्या आश्रमात व्हेलनस्टाईन दिवसाचे आयोजन सोमवारी दुपारी करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, शहराध्यक्षा पंचम कलानी, नगरसेवक रेखा ठाकूर, सामाजिक कार्यकर्त्या काजल मुलचंदानी आदी जण उपस्थित होते.
उल्हासनगर शेजारील द्वारलीपाडा येथील तृतीयपंथीयांच्या विकासासाठी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आश्रम बांधण्यात आला. त्यांच्यात जनजागृती होण्यासाठी सोमवारी व्हेलनस्टाईन डे निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाला राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी पक्षाच्या शहरजिल्हाध्यक्षा पंचम कलानी, नगरसेविका रेखा ठाकूर, सामाजिक कार्यकर्त्या काजल मुलचंदानी, समाजसेविका रागिणी सिंग, डॉ अमोल मोलावडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तृतीयपंथीय संघटनेच्या तमन्ना केने यांनी तृतीयपंथिया बाबात सविस्तर माहिती देऊन त्यांना हक्क हवा आहे. असे सांगितले. महेश तपासे व पंचम कलानी यांनीही त्यांना मार्गदर्शन करून सर्व ताकदीनिशी मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन त्यांनी केले.
शहरातील शहाड फाटक, कॅम्प नं-४ येथील शेकडोच्या संख्येत असलेल्या तृतीयपंथीय यांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती नगरसेविका रेखा ठाकूर यांनी दिली. त्यांची संघटना विविध सामाजिक उपक्रम राबवित असून त्यांच्या हक्कासाठी द्वारलीपाडा येथे आश्रम बांधल्याचे सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी त्यांना व्हेलनस्टाईन दिवसा निमित्त शुभेच्छा देऊन त्यांना साहित्याचे वाटप करण्यात आले.