ठाणे : ठाणे परिवहन समितीच्या बैठकीत खाजगी बसविरोधात कारवाईची मागणी सदस्यांनी केल्यानंतर बुधवारी सकाळी एका सदस्यानेच वाहतूक पोलिसांच्या मदतीने या बसवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. परंतु, काही वेळानंतर पुन्हा त्या रस्त्यावर धावण्यास सुरुवात झाली. त्यामुळे एक सदस्य अशा प्रकारे रस्त्यावर उतरून कारवाई करण्यासाठी पुढाकार घेऊ शकतो, तर मग परिवहन प्रशासन आणि आरटीओला हे का जमत नाही, असा सवाल आता उपस्थित झाला आहे.मागील कित्येक वर्षांपासून घोडबंदर ते ठाणे पूर्व अशी खाजगी बसची वाहतूक सुरू आहे. परंतु, यावर कारवाईचा फार्स केला जात असून काही दिवसांनी ही वाहतूक सुरू होते. परिवहन सेवेचा कारभार सुधारल्यानंतर या खाजगी बसला आळा बसेल, असा दावाही परिवहन प्रशासनाने केला होता. दुसरीकडे कोपरीत या बसमुळे वाहतूककोंडी होऊ लागल्याने त्या बंद करण्यासाठी येथील रहिवासीदेखील रस्त्यावर उतरले होते. त्यानंतर, काही दिवस ही वाहतूक बंद झाली होती. त्यानंतर, गावदेवी आणि नौपाड्यातून त्यांची चोरटी वाहतूक सुरू झाली होती.दरम्यान, खाजगी बसचे बस्तान पुन्हा वाढू लागल्याने त्या बंद केव्हा होणार, असा सवाल करून मंगळवारी परिवहन समितीच्या बैठकीत सदस्य सचिन शिंदे यांनी या बसवर कारवाईची मागणी केली होती. यासंदर्भात प्रशासनाने आरटीओकडे बोट दाखवून त्यांच्याकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याने कारवाई करणे शक्य होत नसल्याचे स्पष्ट केले होते. तसेच एका आठवड्यात संयुक्त पाहणी करून या बसवर कारवाई केली जाईल, असे आश्वासनही दिले होते. परंतु, त्याआधीच सदस्य राजेंद्र महाडिक यांनी बुधवारी सकाळीच वाहतूक पोलिसांच्या मदतीने आनंदनगर जकातनाका येथे या खाजगी बसवर धाड टाकली. यामध्ये या बस कंपनीच्या असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्यक्षात कंपनीच्या बसेस असूनसुद्धा प्रवासी वाहतूक केली जात होती, अशी माहितीदेखील या वेळी समोर आल्याचे महाडिक यांंनी सांगितले. अचानक सुरू झालेल्या या कारवाईमुळे काही काळ या बसची संख्या रोडावली होती. परंतु, १० नंतर पुन्हा ही वाहतूक सुरू झाली.
परिवहन समिती सदस्याचा खाजगी बसवर कारवाईचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2017 5:44 AM