मीरा राेड :मीरा-भाईंदर महापालिक परिवहन सेवेच्या ठेकेदाराचा ठेका रद्द केल्यावर त्याने उच्च न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने पोलीस बंदोबस्त देण्यास सांगितले. त्या अनुषंगाने पालिका आयुक्तांनी शुक्रवारी पोलीस अधिकारी, ठेकेदार व परिवहन कर्मचारी संघटना यांची बैठक घेत बससेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी रात्री ५ बस तर आज शनिवारी सुरुवातीला १५ व दुपारनंतर सहा बस सुरू केल्या. कर्मचाऱ्यांच्या थकीत पगारप्रश्नी पोलीस आयुक्तांनीच पुढाकार घेतल्याने त्यावर तोडगा काढून कर्मचारीही कामावर रुजू झाले.
आमदार प्रताप सरनाईक यांनी सांगितले की, प्रशासनाने मुद्दाम बससेवा स्वत:च सुरू केली नाही. पालिकेच्या विधी सल्लागार आणि ठेकेदार आदींचे संगनमत असल्याने न्यायालयात पालिका हिताची बाजू भक्कमपणे मांडली जाणार नाही, अशी कल्पना होती. न्यायालयाच्या आदेशावरून ते स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी मीरा-भाईंदर - वसई-विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी पुढाकार घेत त्यावर तोडगा काढला. दाते यांच्या सूचनेनुसार बैठकीत कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत २० हजार रु पये व बोनस देण्याची चर्चा झाली. ठेकेदाराने मंगळवारी प्रत्येकी पाच हजार बोनस द्यायचा आणि उरलेली रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरले.
शुक्रवारी रात्री भाईंदर ते उत्तन, चौक आणि मीरा रोड भागात पाच बस चालवण्यात आल्या. शनिवारी उपायुक्त अजित मुठे यांनी ठेकेदारास २१ बस नागरिकांच्या सेवेत सुरू करण्याचे पत्र दिले होते. परंतु, सकाळी १५ बस ठेकेदाराने सुरू केल्या असल्याची माहिती मुठे यांनी दिली.
या मार्गावर साेडण्यात आल्या बस - भाईंदर पश्चिमहून उत्तन, चौक , ठाणे, उत्तन ते मानोरी, भाईंदर पूर्वेहून बोरिवली तर मीरा रोडवरून रामदेव पार्क, शांती विद्यानगरी - घोडबंदर डेपो, वेस्टर्न पार्क , ठाणे या मार्गावर बस सोडण्यात आल्या. १०० कर्मचारी कामावर हजर झाले होते. दुपारनंतरआणखी सहा बस सुरू करण्यात आल्या. यामुळे शहरापासून लांब राहणाऱ्या प्रवाशांना माेठा दिलासा मिळाला आहे. बस बंद असल्यामुळे रिक्षाचा खर्चकरावा लागत हाेता.