भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या मंगळवारी झालेल्या महासभेत परिवहनसेवेचा मुद्दा आयुक्त अशोककुमार रणखांब यांनी मांडला. ही परिवहनसेवा खासगी अथवा बीओटी तत्त्वावर सुरू करण्यात येईल. याबाबत चर्चा व प्रयत्न सुरू आहेत, अशी माहितीही रणखांब यांनी दिली.
आयुक्तांनी मांडलेल्या या प्रस्तावास महासभेने होकार देत त्यासंदर्भात नियोजन करण्याचे निर्देश दिले. त्यामुळे भिवंडी महापालिकेचा आतापर्यंत विविध कारणांनी थांबलेला परिवहनसेवेचा प्रश्न निदान महासभेत चर्चेला आला. भविष्यात ही सेवा सुरू झाली, तर त्याचा भिवंडीतील हजारो प्रवाशांना फायदा होणार आहे. त्यामुळे आयुक्तांनी मांडलेल्या या प्रस्तावास भाजपचे नगरसेवक सुमित पाटील यांनी होकार देत आयुक्तांच्या प्रस्तावाचे स्वागत केले. तसेच भिवंडी शहरात वाहतूककोंडीची समस्या असल्याने मिनीबस व इलेक्ट्रिक बस परिवहनसेवेत सामील करण्याचा सल्ला दिला. तिकिटाचे दर ठरवण्याचा अधिकार महासभेला असावा, अशी सूचनाही पाटील यांनी केली. या परिवहनसेवेत कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना भिवंडीतील नागरिकांनाच प्रथम प्राधान्य द्यावे, अशी सूचना नगरसेविका रसिका रांका यांनी केली.दरम्यान, अनेक दिवसांपासून परिवहनसेवेचा प्रश्न माझ्या मनात होता. आज महासभेत हा विषय मांडल्याने निदान त्यास मुहूर्त मिळाला असून परिवहनसेवेचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत, अशी प्रतिक्रि या आयुक्त रणखांब यांनी व्यक्त केली.