ठाणे : परिवहनच्या ताफ्यात असलेल्या २२७ हून अधिक बस छोट्यामोठ्या दुरुस्तीसाठी मागील पाच ते सात वर्षांपासून धूळखात पडून असल्याची गंभीर बाब बुधवारी परिवहन समिती सदस्यांच्या पाहणी दौऱ्यात पुन्हा एकदा उघड झाली. विशेष म्हणजे एक नवीकोरी बस केवळ नटबोल्ट नसल्याने दुरुस्तीसाठी पडून असल्याचेही दिसून आले.
बुधवारी दुपारी स्थायी समिती सभापती संजय भोईर यांच्यासह परिवहन समितीचे सभापती विलास जोशी यांच्यासह सदस्यांनी वागळे आगार डेपोचा पाहणी दौरा केला. या दौऱ्यात परिवहन कर्मचाऱ्यांना कायकाय अडचणी आहेत, कोणत्या समस्या आहेत, याची माहिती त्यांनी यावेळी घेतली. परंतु, या पाहणी दौऱ्यात त्यांना धक्काच बसला. टायर, हॉर्न, किरकोळ स्पेअरपार्ट नसणे, काचा तुटलेल्या, नटबोल्ट नसणे आदींसह इतर किरकोळ दुरुस्तीसह मोठ्या दुरुस्तीसाठी तब्बल २२७ हून अधिक बस धूळखात पडल्याची गंभीर बाब यावेळी निदर्शनास आली. या बसची दुरुस्ती का होत नाही, असा सवाल भोईर यांनी केला असता, दुरुस्तीसाठी निधीच मिळत नसल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच दुरुस्तीची यादी देऊनही अद्यापही साहित्य उपलब्ध झालेले नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
अहवाल सादर करण्याचे आदेशबसेसची दुरुस्ती का होत नाही, निधीची कमतरता का आहे, भंगार झालेले स्पेअरपार्ट्स का विकले जात नाहीत? यासह ताफ्यातील बस का बाहेर निघत नाहीत, याचा अहवाल एका आठवड्यात सादर करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी प्रशासनाला दिले.