कल्याण : जिल्ह्यातील महत्त्वाचा असलेला मुंब्रा बायपास रस्ता दुरुस्तीमुळे बंद असल्याने अवजड वाहनांची वाहतूक कल्याण-शीळ मार्गाने वळवण्यात आली आहे. परंतु, कल्याणमधून रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत या वाहनांना वाहतुकीस मुभा असली तरी हा नियम तोडून अन्य वेळेतही वाहतूक केली जात आहे. त्यामुळे वाहतुकीचा ताण कल्याण शहरावर पडत असून, येथील नागरिकांना रोजच वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे.भिवंडी-कल्याण-शीळ हा रस्ता प्रामुख्याने कल्याणमधून जातो. तसेच हा रस्ता पुढे नवी मुंबई, पुणे, पनवेल, तळोजा, मुंबई-नाशिक महामार्गला जोडणारा असल्याने या रस्त्यावर वाहतुकीचा प्रचंड ताण आहे. सध्या मुंब्रा बायपासची अवजड वाहनांची वाहतूक कल्याण-शीळ रस्त्याने वळवल्याने शहरातील कल्याण पत्रीपूल, नेतविली, सूचकनाका, टाटा नाका, लोढा जंक्शन, शिवाजी चौक, सहजानंद चौकात वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. विशेषत: कंटनेर, ट्रेलरची वाहतूक भर शहरातून सुरू आहे. अवजड वाहनांसाठी रात्री १० ते सकाळी ६ या वेळेत वाहतुकीस मुभा आहे. मात्र मुंब्रा बायपास रस्ता बंद असल्याचे कारण पुढे करत हे सगळे कंटनेर कल्याण-शीळ रस्त्याने ये-जा करत करत आहेत.शहरातील अत्यंत वर्दळ असलेल्या शिवाजी चौकात काही दिवसांपूर्वी एक भला मोठा लोखंडी पाइप अवजड वाहनावरून खाली पडला. सकाळी ७ ते १० दरम्यान या चौकात नाका कामगारांची गर्दी असते. परंतु, पाइप पहाटे पडल्याने मोठी जीवितहानी झाली नाही. अन्य वेळी हा अपघात घडला असता तर येथे मोठा अनर्थ घडला असता. या घटनेनंतरही वाहतूक नियंत्रण शाखेचे डोळे उघडलेले नाहीत.कल्याण-शीळपाठोपाठ आता कल्याण-अंबरनाथ-बदलापूर रस्त्यावरही कंटेनरची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. या वाहतूकप्रश्नी शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी पोलीस उपायुक्त संजय शिंदे यांची बुधवारी भेट घेत काही गोष्टी त्यांच्या निदर्शनास आणल्या.कल्याण-शीळ रस्त्यावर अनेक शाळा आहेत. त्या भरण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी अवजड वाहनांमुळे एकच गर्दी होते. कोंडीचा फटका कल्याण-शीळ रस्त्यावरील कोंडीचे जंक्शन असलेल्या ठिकाणांबरोबर सहजानंद चौक ते कर्णिक रोडलाही बसतो. मुरबाड रोडवरही वाहतूककोंडी होते. त्यामुळे गोविंदवाडी बायपास, वालधुनी रेल्वे उड्डाणपूल, विठ्ठलवाडी-कल्याण रेल्वेमार्गावरील आनंद दिघे उड्डाणपूल, पुढे काटेमानिवली उड्डाणपुलावरही वाहने अडकून पडतात. कल्याण-पुणे लिंक रोडही कोंडीने बाधित होतो. या रस्त्यांवरील वाहतुकीचे नियोजन योग्य पद्धतीने होत नाही. परिणामी कोंडीत भर पडत आहे. अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे एखादा मोठा अपघात होऊ शकतो, याकडे शिंदे यांनी लक्ष वेधले.>शालेय बेकायदा वाहतुकीकडे कानाडोळाकल्याण शहरात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक मिनी टॅक्सी, रिक्षा यांच्यातून केली जाते. टॅक्सी व रिक्षात प्रमाणापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना कोंबले जाते. मात्र, त्यांच्याविरोधात कारवाई करण्याकडे आरटीओ व वाहतूक नियंत्रण पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. अशा प्रकारच्या बेकायदा शालेय वाहतुकीमुळे रिक्षा व टॅक्सीला अपघात होऊन विद्यार्थ्यांचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या विरोधातही कठोर कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली आहे. या संदर्भातील एक निवेदन त्यांनी वाहतूक नियंत्रण शाखेला दिले.
वाहतूककोंडीचे ‘कल्याण’, अवजड वाहनांची सर्रास वाहतूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 3:05 AM