कल्याण : विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकाजवळ लोकल रूळांवरून घसरल्याने रेल्वेसेवा ठप्प झाली आणि मिळेल त्या वाहनानी-चालत प्रवाशांनी कल्याण स्थानक गाठले. त्यामुळे कल्याण रेल्वे स्थानक परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. कल्याणहून मुंबईला गाडी गाड्या माघारी वळवण्यात आल्याने मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक कोलमडली. त्याचा फटका कल्याण-कसारा रेल्वे मार्गालाही बसला. कल्याणमध्येही अचानकपणे बस, परिवहन सेवा आणि रिक्षांवर ताण पडला. त्यातून परिवहन सेवेने जादा बस सोडूनही खच्चून गर्दी होती. रिक्षांनीही या काळात कल्याण ते अंबरनाथ प्रवासासाठी माणशी १५० ते २०० रुपये उकळल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या.कल्याण स्थानकाबाहेर उल्हासनगरकडे जाणाऱ्या रिक्षा स्टॅण्डवर रिक्षांचा पत्ताच नव्हता. अनेक रिक्षा वाहतूक कोंडीत अडकल्या होत्या. रिक्षा कमी असल्याने चालकांनी प्रवाशांकडून जादा भाडे उकळले. या प्रवाशांच्या लुटीकडे रिक्षा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी मात्र डोळेझाक केली. रिक्षा स्टॅण्डवर प्रवासी रिक्षांच्या प्रतीक्षेत होते. तेथे भली मोठी रांग लागली होती. त्या तुलनेत अंबरनाथहून उल्हासनगरकडे जाण्यासाठी प्रति प्रवासी २० रुपये भाडे आकारले गेले. कल्याण-बदलापूर रोडवरील वालधुनी रेल्वे उड्डाणपुलावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती.
कल्याणमध्ये वाहतुकीची-प्रवाशांची झाली प्रचंड कोंडी
By admin | Published: December 30, 2016 4:10 AM