डोंबिवली : कल्याण-डोंबिवली परिसरात गुन्हेगारी वाढण्यास वाहतूककोंडीची समस्याही जबाबदार आहे. त्यामुळे ही समस्या सुटल्यावर त्यात घट होण्यास मदत होईल, असा विश्वास पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांनी व्यक्त केला आहे. ही समस्या सोडविण्यासाठी पोलीस प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
डोंबिवली पत्रकार संघाच्या वतीने पोलीस उपायुक्त पानसरे यांच्यासोबत वार्तालापाचा कार्यक्रम रामनगर पोलीस ठाण्यात नुकताच झाला. वाहतूककोंडीचा फायदा घेऊ न चोरीच्या घटना घडत आहेत. वाहतूककोंडीमुळे त्रस्त झालेल्या व्यक्तीचा चोरटे फायदा घेतात. जो तो आपल्याच विचारात असल्याने चोरी होताना दिसत असून ती रोखण्याचा प्रयत्न केला जात नाही. सध्या महत्त्वाचे पूल पाडण्यात आल्याने त्यांची कामे सुरू आहेत. हे पूल लवकर बांधणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शहरातील खराब रस्त्यांमुळेही वाहतुकीचे तीनतेरा वाजत असल्याचे पानसरे यांनी सांगितले.
शहरात दुचाकी, रिक्षाचोरीचे प्रमाण वाढलेआहे. त्याचे कारण शहरात वाहने रस्त्यावर उभी केली जातात. त्यामुळे गाडी चोरीला जाऊ नये, असे तंत्रज्ञान वाहने तयार करणाऱ्या कंपन्यांनी अद्याप तरी विकसित केलेले नाही. चोरी होऊ नये, यासाठी दुकानचालकांनी दुकानाच्या आत व दुकानाच्या बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे लावले पाहिजे. त्यामुळे चोरी उघड होण्यास मदत होईल. उपायुक्त पानसरे यांनी सांगितले की, विविध प्रकारचे गुन्हे उघडकीस आणले आहे. नऊ दरोडेखोरांना जेरबंद करून त्यांच्यावर मोक्का लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मुद्देमाल परत करण्याचा उपक्रम येत्या १४ ऑगस्टला करण्यात येणार आहे. तसेच साठी उलटलेल्या सराईत गुन्हेगारांचे नाव हिस्ट्री शिटरच्या यादीतून वगळून नव्यांची यादी तयार केली जात आहे. कल्याण-डोंबिवलीत गँगवारने पुन्हा डोके वर काढू नये, यासाठी डाटा तयार केला जात आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरणाच्या धर्तीवर प्रतिबंधात्मक कारवाई पथक नेमले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मानपाडा पोलीस ठाण्याच्या विभाजनाचा प्रस्तावमानपाडा पोलीस ठाण्याची हद्द मोठी आहे. हद्द मोठी असल्याने मानपाडा पोलीस ठाण्याचे विभाजन करण्याचा प्रस्ताव पाठविला आहे. दावडी व काटई या ठिकाणी दोन पोलीस ठाणी केली जावीत. मानपाडा पोलीस ठाण्याच्या विभाजनाचा प्रस्ताव सरकारकडे पाठविला आहे.