लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : स्वच्छ शहरांच्या यादीत ठाणे शहराची घसरगुंडी उडून महापालिका आणि शहरातील प्राधिकरणांनी यातून बोध घेतला नसून येथील रेल्वे पूल आणि सॅटीसवर फेरीवाल्यांनी हातपाय पसरले असताना तेथील तिकीटघरामागील पुलावर कचरा टाकण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे याला कचराकुंडीचे स्वरूप प्राप्त झाल्याने येथून येजा करणाऱ्या प्रवाशांना त्यातून वाट काढावी लागत आहे. दुसरीकडे रेल्वे प्रशासन त्याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे दिसते.मुंबईच्या दिशेकडे असलेले दोन पूल हे सॅटीसला जोडले आहेत. त्यातील एका पुलालगत रेल्वेचे तिकीटघर आहे. रेल्वे स्टेशनला असलेल्या एकं दरीत सर्व पुलांसह सॅटीसवर फेरीवाल्यांनी दिवसेंदिवस कब्जा केल्याचे दिसते. त्यातच, तिकीटघरामागे झाडे लावण्यासाठी एक कुंडी ठेवली होती. तिचाच वापर हळूहळ कचरा टाकण्यासाठी सुरू झाला आहे. त्यामध्ये कचरा वाढल्याचे पाहून कोणीतरी ती कुंडीच हलवून तो कचरा खाली टाकला. दिवसेंदिवस हा कचरा वाढल्याने आता तो पुलावर पसरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना त्यातून वाट काढून चालावे लागत आहेत. रेल्वे प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने एक सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. बहुधा, त्या कॅमेऱ्यात हा प्रकार कैद झाला असेल. तसेच त्या पुलावर दिवसेंदिवस वाढणारा हा कचरा रेल्वे प्रशासनास दिसत नाही का, असा सवाल प्रवासी करीत आहेत. वेळीच याकडे लक्ष दिले नाही, तर त्या पुलाचे कचराकुंडीत रूपांतर होण्यास वेळ लागणार नसल्याचे बोलले जात आहे. सॅटिससारख्या गाजावाजा करून उद्घाटन झालेल्या या पुलावर असा कचरा पडून राहणे, हे अत्यंत अशोभनीय आहे. याविरोधात प्रशासन काहीही कार्यवाही करत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
सॅटीसवरील तिकीटघरामागे कचरा
By admin | Published: May 12, 2017 1:41 AM