- संदीप प्रधान(वरिष्ठ सहायक संपादक)
जगातल्या निगरगट्ट प्रशासनांची यादी केली तर मध्य रेल्वेचे प्रशासन हे सर्वात निगरगट्ट ठरेल. प्रवाशांना गृहीत धरून दररोज नवनवी कारणे देत लोकल वाहतूक किमान अर्धा तास उशिरा चालवण्याचा खाक्या त्यांनी वर्षानुवर्षे सुरू ठेवला आहे. या गोंधळामुळे सकाळपासून अगदी रात्री उशिरापर्यंत रेल्वे स्थानकांवर तोबा गर्दी असते. ऑफिसला लेटमार्क होईल, नोकरी जाईल या भीतीने अनेकजण कसेबसे लटकून प्रवास करतात. हात सुटला तर पडून मरण पावतात किंवा जायबंदी होतात. या प्रत्येक मृत्यूकरिता मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला तरच मध्य रेल्वे सुरळीत होईल.
मागील आठवड्यात मध्य रेल्वेने महामेगाब्लॉक घेतला. ठाणे व छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे फलाट रुंदीकरणासह कामे केली. लोकल प्रवाशांनी आम्हाला सहकार्य करावे व वर्क फ्रॉम होम करावे, विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केल्यामुळे ठाण्याच्या पलीकडे राहणाऱ्या लाखो प्रवाशांनी रेल्वेला सहकार्य केले. माध्यमांनी रेल्वेच्या कामाचे व नियोजनाचे कौतुक केले. वेळेत काम पूर्ण केल्याची टिमकी रेल्वे प्रशासनाने वाजवली. सोमवार उजाडल्यावर लोकल वेळेवर धावतील, केलेल्या कामाचा दृश्य स्वरूपात फायदा होईल ही अपेक्षा प्रवाशांनी ठेवली तर त्यात त्यांची चूक काय? पण सोमवारपासून सुरू असलेला गोंधळ आठवडा संपत आला तरी आवरलेला नाही. ब्लॉक घेतल्याने लोकल व लांब पल्ल्याच्या गाड्यांचा वेग नियंत्रित केला. त्यामुळे गाड्यांचे बंचिंग (एका मागोमाग गाड्या उभ्या राहणे) होते. त्यामुळे गोंधळ सुरू असल्याची निर्लज्ज कबुली रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्याने दिली. रेल्वेचे अन्य काही अधिकारी खासगीत सांगतात की, मेगाब्लॉकमध्ये केलेली काही कामे सदोष झाल्याने हा बंचिंग कालावधी पहिल्या दिवसापासून हळूहळू कमी झालेला नाही. म्हणजे आता कामात झालेल्या चुका सुधारण्याकरिता नवा महामेगाब्लॉक रेल्वे घेणार का? हस्तीदंती मनोऱ्यातील अधिकाऱ्यांना
दु:ख कसे कळणार?या गोंधळाचा परिणाम असा की, दररोज कुणी ना कुणी लोकलमधून पडून मरण पावत आहे. ज्यांच्यावर कुटुंब अवलंबून आहे, असा माणूस केवळ मध्य रेल्वेच्या अर्धा तास उशिरा लोकल चालवण्यामुळे मरत असेल तर त्याची शिक्षा कुणाला करायची? यावर रेल्वेचे बेरड प्रशासन असा युक्तिवाद करेल की, त्या प्रवाशाला आम्ही लोकलला लटकून प्रवास करायला सांगितले का? बरोबर आहे. अशी जोखीम त्याने पत्करायला नको होती. पण अनेक खासगी कंपन्या वरचेवर कामावर उशिरा येणाऱ्यांना थेट घरचा रस्ता दाखवतात. पोटासाठी धडपडणारा माणूस त्यामुळे जीवावर उदार होतो. कुलाब्यातील बधवार पार्कमधील आलिशान फ्लॅटमध्ये राहायचे आणि सीएसएमटीला काम करायचे अशा हस्तीदंती मनोऱ्यातील रेल्वेच्या अधिकाऱ्यांना प्रवाशांचे दु:ख कळणार नाही. मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी एक दिवस डोंबिवली किंवा दिव्यात सीएसएमटीकडील जलद लोकल सामान्य प्रवाशांसारखी सकाळी पकडून दाखवावी.
प्रवाशांना होणार फलाटावर आंघोळरेल्वेने ठाण्यातील फलाटांची रुंदी वाढवली. पाऊस आता मुंबईच्या वेशीवर येऊन ठेपला आहे. या फलाटांवरील शेड पुढेपर्यंत वाढवली नाही तर पावसाळ्यात प्रवाशांना घरी आंघोळ करायची गरज लागणार नाही. धो-धो पाऊस पडत असताना अगोदर छत्री बंद करायची, पावसात भिजायचे की रेल्वेत प्रवेश करायचा अशी तारांबळ प्रवाशांची उडणार नाही. प्रवाशांकरिता नवनवीन संकटे निर्माण करण्याची ही विकृती प्रवाशांच्या सहनशीलतेचा अंत पाहणारी आहे.