स्टार १०७१
अनिकेत घमंडी
लोकमत न्यूज नेटवर्क
डोंबिवली : कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व व्यवसाय, उद्योग पूर्वपदावर येऊ लागले आहेत. दुसरीकडे श्रावण आणि त्यातही विशेष म्हणजे रक्षाबंधनामुळे बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल्स व्यावसायिकांनी बसच्या फेऱ्या लॉकडाऊनपेक्षा आता बऱ्यापैकी पूर्ण क्षमतेने वाढवल्या आहेत. मात्र, डिझेल दरवाढीचा फटका ट्रॅव्हल्स बसने जाणाऱ्या प्रवाशांना बसला आहे. त्यामुळे त्यांना गतवर्षीच्या तिकिटांच्या तुलनेत १०० रुपये जादा मोजावे लागत आहेत.
कोरोनाकाळात सरकारने अनेक बंधने घातली होती. पहिल्या लॉकडाऊनमध्ये प्रवाशांना एसटी वा खासगी ट्रॅव्हल बस, जीप, मोटारीने एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नव्हते. अगदी महत्त्वाच्या कारणांसाठी ई-पास घेऊन प्रवास करावा लागत होता. त्यानंतर अनलॉकमध्ये ही बंधने काहीशी शिथिल झाली. मात्र, पुन्हा रुग्ण वाढल्याने दुसऱ्या लॉकडाऊनमध्ये प्रवासावर काही बंधने आली. मात्र, आता रुग्ण घटल्याने निर्बंध शिथिल झाले आहेत. सध्याचे सणवार विचारात घेऊन नागरिक पुन्हा बाहेरगावी जाऊ लागले आहेत. त्यामुळे विविध ट्रॅव्हल्सच्या बस सुरू झाल्या आहेत. डोंबिवली ते सांगली, सातारा अथवा जळगावला जायचे झाल्यास ६०० रुपये द्यावे लागत आहेत. मात्र, शनिवार, रविवार तसेच सुटीचा दिवस लागून आल्यास ५० ते १०० रुपये जादा मोजावे लागत आहेत.
--------------------
या मार्गावर ट्रॅव्हल्सची भाडेवाढ
मार्ग-आधीचे भाडे- आता
डोंबिवली-सांगली ५००- ६००
डोंबिवली-जळगाव ५००- ६००
डोंबिवली- कोल्हापूर ६००-७००
------------------------
कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आल्याने प्रवाशांची गर्दी वाढल्याने ट्रॅव्हल्स बसची संख्या वाढली आहे. कोविडकाळात कल्याण, डोंबिवली परिसरातून सुमारे ५० बस सुटत होत्या. त्यात आता २५ ने वाढ झाली असून आता ७५ बस सोडण्यात येत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.
----------------
डिझेल दरवाढीमुळे प्रवासी तिकिटात १०० रुपयांनी भाडेवाढ करण्यात आली. सुटीच्या काळात त्यात काहीशी वाढ करण्यात येत आहे. हळूहळू परिस्थिती सुधारत आहे असे वाटते.
- प्रवीण हरिया, मुंबई टूर्स ॲण्ड ट्रॅव्हल असोसिएशनचे अध्यक्ष, कल्याण-डोंबिवली एरिया
-------------