ठाणे: अत्रे कट्टयावर ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कार्याचा प्रवास त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून उलगडण्यात आला. ठाण्यातील पुरूषोत्तम प्रभू, राजश्री भावे, सुधा गोखले, शंकर आपटे या चारही ज्येष्ठ नागरिक आपल्या या वयातही सामाजिक कायार्ची आवड जोपासत असून ते समाजासाठी कसे धडपडत आहे हे त्यांनी यावेळी अनेक प्रसंग, किस्से आणि अनुभवातून सांगितले. आचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने अत्रे कट्ट्यावर संपदा वागळे यांनी या चारही ज्येष्ठांची मुलाखत घेऊन त्यांचे अद्वितीय कार्य ठाणेकरांसमोर आणले. वृद्धांना घराबाहेरील कामासाठी नेण्यासाठी स्वयंसेवक माया केअर या संस्थेमार्फत पुरविण्यात येतात. या संस्थेत सुधा गोखले यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. गेली दहा वर्षे ते या संस्थेत समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. या माया केअरचा त्यांनी प्रवास उलगडला तसेच, २०१२ पासून चैतन्य वृद्धाश्रमात त्या काम करीत असून तेथील कार्याबद्दलही माहिती दिली. ज्या वृद्धांना मदतीसाठी स्वयंसेवक हवे असल्यास त्यांनी माया केअरशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील त्यांनी केले. राष्ट्रीय पुरस्कारासाठी अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा प्रस्ताव दिल्लीला पाठविणाºया शंकर आपटे यांनी त्यांना आलेले अनेक कटु - चांगले अनुभव सांगितले. ठाण्यात काही दिवसांपुर्वी एक महिला स्पीड ब्रेकरवरुन पडली असता तेथील दोन वाहतूक पोलीसांनी तिला मदत केली. अशा पोलीसांना सरकारी योजनेत मदत मिळते हे मला माहित असल्याने त्यांचा सन्मान व्हावा यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या अनेक योजना असतात त्याबद्दल काहींना माहीत असतात तर काहींना नाही आणि ज्यांना माहित असतात ते इतरांना सांगण्याचे कष्टही घेत नसल्याची खंत आपटे यांनी व्यक्त केली. ठाणे पुर्व येथील मरगळीस आलेला विरंगुळा केंद्राचे अध्यक्षपद घेतल्यावर त्या केंद्राला पुनर्जीवन देण्याचे काम केले. त्यानंतर आता अनेक ज्येष्ठांच्या करमणूकीचे कार्यक्रम तेथे होत असून बरेच कट्टेकरी तेथे येतात असे प्रभू यांनी सांगितले. रोज ठाणे ते कल्याण असा प्रवास करीत असताना अनेक लहान मुले हरवितात किंवा अनेकांची महत्त्वाची कागदपत्रे हरवितात, ती सुखरुप पोहोचविण्याचे काम करणाºया भावे यांनी आपल्याला या कामात आलेले अनेक चांगले वाईट प्रसंग सांगितले. तसेच, रस्त्यावर कोपºयात, झाडांच्या आजूबाजूला देवाचे फोटो, मुर्ती, देव्हारे ठेवलेले असतात ते पर्यावरणपद्धतीने विसर्जन केले जाते या कार्याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या हे काम चांगले की वाईट याचा मी कधीच विचार केला नाही. परंतू सुरूवातीला मी हे देव गोळा करीत असताना मला वाटायचे हे देव रस्त्यावर का? सुरूवातीला तीन ते चार वर्षे कल्याण येथील गणेशघाटात विसर्जन करायची. मग पर्यावरण ही संकल्पना राबविली जाऊ लागली, त्यावेळी वाटले आपण हे विसर्जन करताना काही चुकतंय का़? अशा पद्धतीचे विसर्जन पर्यावरणाला घातक असल्याचे लक्षात आल्यावर मग हे देव घरी आणून पर्यावरणपुरक पद्धतीने विसर्जन करु लागले. कोणतेही कार्य करताना वय, वजन, उंची हे आड येत नसते. फक्त तुमचे मन चांगले हवे, प्रामाणिकपणे काम करणे आणि देवाला घाबरता कामा नये.
अत्रे कट्ट्यावर उलगडला सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कार्याचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2019 5:19 PM
ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त ठाण्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यांचा प्रवास उलगडण्यात आला.
ठळक मुद्दे अत्रे कट्ट्यावर उलगडला सामान्यातील असामान्य व्यक्तींच्या कार्याचा प्रवासआचार्य अत्रे सांस्कृतिक मंडळाच्यावतीने मुलाखत अद्वितीय कार्य ठाणेकरांसमोर आणले