ठाणे : कोरोनाची दुसरी लाट ओसरत आली असतानाही ठाणे महापालिकेची तिजोरी मात्र रितीच आहे. महापालिकेच्या तिजोरीत सध्याच्या घडीला ४० कोटींचाच निधी शिल्लक असून, ८०० कोटींची बिले पालिकेला अदा करायची आहेत. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसत नसल्याने ही बिले कशी द्यायची, असा पेच पालिकेपुढे आहे. ऑगस्ट महिना संपत आला असतानाही ३७७.३८ कोटींचेच उत्पन्न पालिकेला मिळविता आले आहे. त्यामुळे उत्पन्न वाढल्यानंतर खर्चाचे नियोजन करण्याचे पालिकेने जे भाष्य केले होते, ते आता लांबणीवर पडणार असल्याचे दिसत आहे.
कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून ठाणे महापालिकेच्या तिजोरीवर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे. आयुक्तांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात १४६९.८९ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. परंतु त्यापैकी सहा महिन्यानंतर अवघे ३७७.३८ कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळविता आलेले आहे. मालमत्ता आणि पाणी कर वगळता शहर विकास विभागाकडून उत्पन्नाबाबत घोर निराशा झालेली आहे. शहर विकास विभागाकडून पालिकेने ३४२ कोटींचे उत्पन्न अपेक्षित धरले होते. मात्र आतापर्यंत ७७.८१ कोटींचे उत्पन्न पालिकेला मिळविता आले आहे. मालमत्ताकरापोटी २३९.९९ कोटी, पाणी करपोटी १९.३२ कोटींचा निधी पालिकेला मिळविता आला आहे. इतर विभागाकडूनही अपेक्षित उत्पन्न पालिकेला मिळविता आलेले नाही.
दुसरीकडे कोरोना काळात पालिकेकडून आतापर्यंत २३३ कोटींचा खर्च करण्यात आला आहे; तर कोरोनासाठी ७१० कोटींच्या खर्चाला मंजुरी मिळालेली आहे. त्यातही सिडको, एमएमआरडीए आणि शासनाकडून पालिकेला आतापर्यंत ५१ कोटींचाच निधी यासाठी प्राप्त झालेला आहे. पालिकेकडून शासनाकडे २०० कोटींची मागणी करण्यात आली होती. परंतु पालिकेला केवळ ५१ कोटींचाच निधी प्राप्त झाला आहे. पालिकेने मागील सात महिन्यांत ९० कोटींच्या कामांची बिले अदा केलेली आहेत.
(जोड बातमी आहे)