लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणो : जिल्ह्याच्या आदिवासी दुर्गम, अतिदुर्गम आणि ग्रामीण भागांच्या गावपाड्यांसह खेड्यांमध्ये आजमितीस एक हजार ६९० कुपोषित (सॅम, मॅम) बालके जिल्ह्यात रांगत आहेत, तर कोरोना कालावधीत म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या संचारबंदीत ११ हजार ४३८ तीव्र व मध्यम कुपोषित बालकांवर आरोग्य यंत्रणेने उपचार केले आहेत. त्यांच्या सुदृढ आरोग्याकरिता महिला व बालकल्याण विभागाने पोषण आहाराचे घरपोहोच वाटप करून त्यांची काळजी घेतली. यामध्ये तीव्र कुपोषित एक हजार १५ बालकांसह मध्यम कुपोषित दहा हजार ४२३ बालकांचा समावेश आहे. मात्र, कोरोनाच्या संचारबंदीत जिल्हाभरातील गावपाड्यांमध्ये कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ होऊन वर्षभरात तब्बल ११ हजार ४३८ बालकांवर उपचार करावा लागल्याचे अहवालावरून उघड झाले आहे.
जिल्ह्यात गावपाड्यांतील या कुपोषित बालकांच्या सुदृढतेसाठी शहापूर, डोळखांब या दोन मोठ्या प्रकल्प कार्यालयांसह सात अंशत: आदिवासी प्रकल्प कार्यालये सक्रिय आहेत. या यंत्रणेद्वारे व आरोग्य विभागाच्या निगराणीत या १४७ तीव्र कुपोषित (सॅम) बालकांसह मध्यम कुपोषित (मॅम) एक हजार ५४३, असे एक हजार ६९० कुपोषित आहेत.