मुंब्रा : शहरातील काही रुग्णालयांप्रमाणे प्राइम क्रिटीकेअरमध्ये लक्षणे नसलेल्या परंतु बाधित असलेल्या कोरोना रुग्णांवर उपचार करण्यात येत होते, अशी खळबळजनक माहिती या रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर उघडकीस आली.
‘प्राइम’मध्ये लागलेल्या आगीनंतर ज्या अतिदक्षता विभागातील चार रुग्णांचा दुसऱ्या दवाखान्यात नेताना तसेच उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यांतील एक हरीश सोनावणे हे कोरोनाने बाधित होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना करण्यात आलेल्या तपासणीच्या अहवालानुसार मंगळवारी रात्री ते पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले होते. यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. बुधवारी सकाळी त्यांना कौसा भागातील मौलाना अबुल कलाम स्टेडियममधील कोविड आरोग्य केंद्रात कोरोनावरील उपचारांसाठी दाखल करण्यात येणार होते.
तत्पूर्वी पहाटे रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर लागलेल्या आगीच्या धुराचे लोट अतिदक्षता विभागात पसरल्यामुळे आधीच कोरोनामुळे प्रकृती खालावलेल्या सोनावणे यांचा धुरामुळे श्वास कोंडल्यामुळे गुदमरून मृत्यू झाला. दरम्यान, मुंब्र्यातील काही रुग्णालयांमध्ये लक्षणे नसलेल्या; परंतु बाधित असलेल्यांवर सर्रासपणे उपचार करण्यात येत असल्याची माहिती कोविड केंद्राच्या समन्वयक डॉ. शार्मिन डिंग्गा यांनी दिली.