ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाने वृक्षवल्ली उपक्रमांतर्गत रेमण्ड कंपनीच्या मैदानावर १० ते १२ जानेवारी या कालावधीत झाडे, फुले, फळे व भाजीपाला स्पर्धा व भव्य प्रदर्शनाचे आयोजन केले आहे.या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्र वारी दुपारी ३ वाजता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड व महापौर नरेश म्हस्के उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण रविवारी सायंकाळी ६ वाजता होणार आहे. वृक्षांबाबत जनजागृती व्हावी, याकरिता गेल्या १२ वर्षांपासून ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागाच्या वतीने असे प्रदर्शन आयोजित केले जात आहे. या प्रदर्शनात शोभिवंत पानाफुलांच्या कुंड्या, वामनवृक्ष, कॅक्टस, सकुलंट, ब्रोमेलियाझ, आॅर्किड्स गुलाबपुष्प, पुष्परचना औषध व सुगंधी व वनस्पती, फळझाडे, फळांची मांडणी, भाजीपाला, उद्यान प्रतिकृती, निसर्ग व पर्यावरणावर आधारित छायाचित्र, रंगचित्र आदींचे प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनामध्ये शोभिवंत झाडे, फुलांची रोपे, कुंड्या, औषधी वनस्पती, फळझाडे, उद्यानासाठीची अवजारे, बी-बियाणे, खते आदींची खरेदी करता येणार आहे.>१०० वैयक्तिक स्पर्धक सहभागीया स्पर्धेसाठी वीसहून अधिक विविध शासकीय आणि खाजगी संस्थांच्या उद्यान विभागांचे तज्ज्ञ हे परीक्षक म्हणून काम पाहणार आहेत. प्रदर्शनात ४० स्टॉलधारकांसह अंदाजे १०० वैयक्तिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. हे प्रदर्शन विनामूल्य असून नागरिकांनी या प्रदर्शनाचा जास्तीतजास्त लाभ घ्यावा, असे आवाहन महापौर नरेश म्हस्के, आयुक्त तथा वृक्ष प्राधिकरण अध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी केले.
ठाण्यात आजपासून वृक्षवल्ली २०२० प्रदर्शन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2020 1:11 AM