ठाणे: धावत्या दुचाकी आणि मोटारीसह रस्त्यालगत उभ्या असलेल्या रिक्षावर ३० वर्ष जुने गुलमोहराचे झाड कोसळल्याची घटना बुधवारी रात्री ८ वाजून १० मिनिटांच्या सुमारास वागळे इस्टेट येथे घडली. या घटनेत अनोळखी दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केल्याची माहिती सूत्रांनी दिली. या घटनेमुळे काही काळ या भागातील वाहतूक कोंडी झाली होती. अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.
रोड क्रमांक १६ येथील द्वारका हॉटेल समोरील हे गुलमोहराचे झाड रस्त्याशेजारी उभ्या केलेल्या रिक्षा तसेच श्रीनगर कडे जाणाऱ्या मोटारीसह दुचाकीवर पडले. घटनेची माहिती मिळताच महापालिका उपायुक्त शंकर पाटोळे यांच्यासह उद्यान निरीक्षक, उद्यान तपासणीस व वृक्ष प्राधिकरण विभागाचे कर्मचारी तसेच अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेत हे झाड कापून बाजूला केले.
हे झाड कापून बाजूला केल्यानंतर हा रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. या घटनेत जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव समजू शकले नाही. या अपघातात तीन वाहनांचे नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.