ठाणे: विकास कामांचा लेखाजोखा मिळवण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये फारसी संधी मिळाली नाही. त्यामुळे आमदार कुमार ऐलानी यांनी ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्यासह संबंधित जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विकास कामांची झाडाझडती घेतली. यामध्ये कल्याण तालुक्यातील म्हारळगांव, कांबा, वरप आदी ग्रामीण भागाच्या पाणी समस्येसह स्मशानभूमी, सांडपाणी समस्या, कल्याण - नगर महामार्गाच्या कामांची झाडाझडती यावेळी घेतली.
उल्हासनगर विधान सभेच्या कार्यक्षेत्रात कल्याण तालुक्यातील काही ग्रामीण भागाचा समावेश आहे. त्यातील विविध विकास कामे ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाकडून करण्यात येत आहे. तर महामार्ग बांधकाम विभागाकडून कल्याण - नगर या महामार्गाचे काम सुरू आहे. मात्र अर्धवट काम असल्यामुळे या परिसरातील वाहतूक कोंडीसह गांवकऱ्यांना विविध समस्यांना तोड द्यावे लागत आहे. त्या कामाला त्वरीत पूर्ण करण्यात येऊन ते दर्जेदार व्हावे यासाठी ऐलानी यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. याशिवाय याशिवाय या महामार्गाच्या कामासह विविध शासकीय प्रकल्पांसाठी भूसंपादीत केलेल्या शेतकºयांना त्यांच्या जमिनीचा मोबदला तत्काळ देण्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात ही आढावा बैठक पार पडली. त्यामध्ये कचऱ्याच्या डम्पिंगसाठी जागा उपलब्ध करून देण्यासह कांबा गावाजवळील वाटर फिल्टरच्या कामे त्वरीत पूर्ण करणे, म्हारळ, वरप, कांबा गावांसाठी स्मशानभूमी बांधणे, पाणी पुरवठा सुरळीत व मुबलक पाणी,अग्निशमन केंद्र, पोलीस स्टेशनसाठी जागा, तलाव सुशोभीकरण, मध्यवर्ती रुग्णालयाच्या विकासासाठी निधी, प्राथमिक आरोग्य केंद्राचे बांधकाम इत्यादी विषयाचा या बैठकीत आढावा घेण्यात आला.