- नितिन पंडीत
भिवंडी- शासनाच्या वतीने पर्यावरण संवर्धनासाठी विविध प्रयत्न केले जातात मात्र त्याकडे नागरिक दुर्लक्ष करीत झाडांची राजरोस कत्तल करीत असतो. त्यातच जंगलांचा ऱ्हास होत असल्याने पर्यावरण रक्षणाची जागतिक समस्या सध्या सर्वत्र निर्मा झाली आहे. मात्र अशा परिस्थितीतही कोणतीही शासकीय मदत न घेता पर्यावरण रक्षणासाठी "एक झाड माणुसकीचं ,एक पाऊल परिवर्तनाचे" हि मोहीम हाती घेत रायगड ते सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट असा सुमारे दोन हजार किलोमीटरचे अंतर पायी चालत देशातील नागरिकांना पर्यावरण राक्षणासोबतच झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत भिवंडीतील २४ वर्षीय तरुणाने आगळी वेगळी मोहीम हाती घेतली आहे. त्याच्या मोहिमेचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सिद्धार्थ गणाई असे या २४ वर्षीय पर्यावरणवादी ध्येयवेड्या तरुणाचे नाव असून मागील ९ दिवसांपूर्वी २० जुलैला त्याने रायगड येथील छ. शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेऊन रायगड ते माउंट एव्हरेस्ट या मोहिमेला सुरुवात केली आहे. सिद्धार्थ अंधेरी येथील भवन महाविद्यालयात टी.वाय. बीएस.सी मध्ये शिक्षण घेत असून भिवंडीतील बापगाव येथील मैत्रिकुल येथे तो आपल्या मित्रांसोबत राहतो. पाच वर्षांपूर्वी त्याने माउंट एव्हरेस्ट शिखर चढण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. मात्र त्यासाठी येणार आर्थिक खर्च मोठे असल्याने सिद्धार्थने मोटरसायकल , सायकल , स्केटिंग अशा सर्व पर्यायांचा विचार व अभ्यास केलामात्र त्यातही खर्च व अडचणी जास्त असल्याने सिद्धर्थने पायी प्रवास करून माउंट एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला आहे. या मोहिमेत चालत जातांना प्रकृती बिघडू नये म्हणून फक्त घरचे जेवण व पाणी मिळावे असे आवाहन तो पायी जातांना करत असून प्रत्येक ठिकाणी थांबून एक एक झाड लावून ' एक झाड माणुसकीचा , एक पाऊल परिवर्तनाच' हा सामाजिक संदेश देत आहे.
पर्यावरणवादी सिद्धार्थ गणाईचे बालपण अत्यंत हलाखीत गेले आहे. सिद्धार्थ लहान असतांनाच आई वडिलांच्या घटस्फोट झाला . त्यावेळी पालन पोषणाची जबादारी वडिलांनी स्वीकारली . मात्र वाडीलांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणी एक ते दोनवर्ष सिद्धार्थने मुंबईतील अंधेरी येथील एका पुलाखाली आपले बालपण काढले. त्यांनतर पोलिसांच्या मदतीने सिद्धर्थच्या आईचा शोध घेण्यात आला त्यावेळी त्याची आई केरळ येथे असल्याने सिद्धार्थचे प्राथमिक शिक्षण केरळ येथे झाले.मात्र २०११ पासून तो मुंबईत परतला. त्यांनतर मावशी व इतर नातेवाईकांनी त्याचा सांभाळ केला.
सध्या तो भिवंडीतील बापगाव येथील मैत्रीकुल येथे राहत असून विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या विद्यार्थी भारती संघटनेचा सदस्य असून येथूनच त्याला माउंट एव्हरेस्ट सर करण्याची प्रेरणा मिळाल्याचे सिद्धार्थ गणाई याने लोकमत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. विशेष म्हणजे त्याच्या या मोहिमेला कोणतीही शासकीय मदत मिळाली नसून त्याने स्वतःच पायी आपल्या स्वप्नंना गवसणी घातली आहे. सिद्धार्थ याचा नवव्या दिवसाचा प्रवास भिवंडीतून झाला. यावेळी पडघा परिसरातील युवा कवी मिलिंद जाधव यांनी त्याचे स्वागत करत एक झाड लावून त्यालापुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
निसर्गाची होत चाललेली कत्तल आणि निसर्गाचा कोप ही परिस्थिती मानवी जीवनावर येण्याचं मूळ कारण आपणच आहोत, आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी प्रयत्न करणारे देखील आपणच आहोत यासाठी मी हा एक छोटा प्रयत्न करत आहेअशी प्रतिक्रिया पर्यावरणवादी सिद्धार्थ गणाई याने दिली आहे.