अजित मांडके ठाणे : ठाण्यातील ढोकाळी भागातील एका विकासकाच्या प्रकल्पातील ३०० वर्षे जुन्या वडाच्या झाडावर अलीकडेच कुºहाड चालवण्याचा मुद्दा तापला होता. हा वृक्ष वाचवण्याकरिता वृक्षप्रेमींनी एकजूट करून संघर्ष सुरू केला आहे. ठाणे शहरात ३०० ते १०० वर्षांपूर्वीचे असे एकदोन नव्हे, तर १०० वृक्ष असून त्यांना हेरिटेजचा दर्जा प्राप्त व्हावा, याकरिता वृक्षप्रेमींचा संघर्ष सुरू आहे.
ढोकाळी येथील वृक्ष ३०० वर्षांपूर्वीचा की त्यानंतरचा, यावर चर्वीतचर्वण केले जात असले, तरी जाणकारांच्या मते तो ३०० वर्षे जुना असून शंभरहून अधिक वर्षे जुना नक्कीच आहे. ठाण्यातील वृक्षतज्ज्ञांनी केलेल्या एका सर्वेक्षणात शहरात शंभरहून अधिक वृक्ष हे १०० वर्षांहून अधिक जुने आहेत. यातील अनेक वृक्ष हे खाजगी मालकीच्या जागेत असल्याने ते आतापर्यंत जगले आहेत. परंतु, त्यांचे नेमके आयुर्मान ठरवण्यासाठी वैज्ञानिक पद्धत आपल्याकडे विकसित झालेली नसल्याने त्या झाडांच्या फांद्या किती जुन्या आहेत, त्यांच्या बुंध्याचा घेर केवढा आहे, यावरून आयुर्मानाचा अंदाज बांधला जात आहे.
काही दिवसांपूर्वी ठाण्यातील एका दक्ष नागरिकाने ढोकाळी भागातील वडाच्या झाडाचा मुद्दा ठाणेकरांच्या निदर्शनास आणला. त्याच्या असंख्य फांद्या, त्याची खोलवर जमिनीत गेलेली मुळे यावरूनच तो वड ३०० वर्षे जुने आहे, असा दावा अभ्यासकांनी केला. त्या अजस्र वटवृक्षाच्या छायेत उभे राहिल्यावर त्याचे वय ३०० वर्षे असू शकते, असा अंदाज येतो.
हे शेकडो वर्षांचे वृक्ष खाजगी जागेत अधिक प्रमाणात आढळून आले असून त्यामुळेच ते जगू शकले असल्याचेही या अधिकाऱ्याने कबूल केले. या वृक्षरूपी पुराणपुरुषांनी अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिले असल्याने त्यांचे जतन करणे, हे प्रत्येक ठाणेकराचे कर्तव्य आहे.
ठाण्यातील हरियाली या संस्थेच्या माध्यमातून काही वर्षांपूर्वी शहरातील १०० किंवा त्यापेक्षा जुन्या वृक्षांचा सर्व्हे करण्यात आला होता. यामध्ये वड, पिंपळ आदींसह इतर महत्त्वाच्या झाडांचा समावेश आहे. आजमितीला शहरात शंभरहून अधिक जुने वृक्ष असल्याचे ठाणे महापालिकेनेही मान्य केले.या वृक्षांना हेरिटेजचा दर्जा मिळावा, म्हणून पालिकेची एक समिती २०१५ पासून काम करत आहे. काही वृक्षांचा हेरिटेजच्या यादीत समावेश करण्यात आला असल्याचा दावा पालिकेने केला आहे. परंतु, अद्याप त्याची अधिकृतरीत्या घोषणा केली नसल्याचे एका उच्चपदस्थ अधिकाºयाने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर स्पष्ट केले आहे.