ठाणे : जिल्ह्यात सर्वाधिक ठाणे तालुका, शहर परिसरात 164 मिमी पाऊस पडला. शहरात तब्बल 18 ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे ठाणेकरांचे हाल झाले. मुसळधार पावसाची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिका आयुक्त डाँ. विपिन शर्मा व ठाणे पोलिस आयुक्तालयाने नागरिकांना कारण नसताना घरा बाहेर पडण्यास मनाई केली आहे. शहरांमधील या पावसाचा जोर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मात्र कमी आहे.
बारवी धरणात सर्वाधिक 104 मी पाऊस पडला. भातसात अवघा 56 मिमी पाऊस गेल्या 24 तासात पडला. जिल्ह्यात सरासरी अवघा 92.6 मिमी पाऊस पडला. यामध्ये ठाणेला सर्वाधिक तर कल्याणला 110, भिवंडीला 124, उल्हासनगर 107 आणि अंबरनाथला 91 मिमी पाऊस पडला. या तुलनेत अत्यंत कमी पाऊस मुरबाडला 24 तर शहापूरला 48 मिमी पाऊस पडला. मुंबई ला पाणी पुरवठा करणार्या भातसा धरणात अवघा 56 मिमी, आंध्रा धरणात 59, मोडकसागर मध्ये 41, तानसात 76 आणि सर्वात जास्त बारवी धरणात 104 मिमी पाऊस पडला.
घोडबंदर रोडवरील गायमुख गावात पाणी साचले आहे. ठाणे शहरात आताही पावसाचा जोर अधिक आहे. ठिकठिकाणच्या 18 जागी पाणी तुंबल्यामुळे ठाणेकरांच्या वाहतुकीस अडथळा निर्माण झाला. वागळे ईस्टेटच्या परिसरात किराणा दुकान 9 घरांवर पडून त्यांचे नुकसान झाले. आगीच्या तीन किरकोळ घटना घडल्या. पातलीपाडा, नौपाडा आदी ठिकाणची 26 झाडे उन्मळून पडली आहेत. पाच झाडे धोकादायक स्थितीत आहेत.