ठाणे : ग्रामीण भागातील गावपाडे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेखाली टेस्ट, ट्रेसिंग आणि ट्रीटमेंट या ट्रिपल ‘टी’ त्रिसूत्री उपचारपद्धतीला गतिमान करून लाभार्थी नागरिकांचे लसीकरण वाढविण्यावर भर देण्याचे निर्देश ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी जिल्हा आणि तालुक्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना सोमवारी दिले. यामुळे आगामी काळात गाव कोरोनामुक्त करण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्हिडिओ कॉन्फरसद्वारे घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी व्यक्त केली.
सध्याच्या घडीला ग्रामीण भागात ३४ हजार ४०१ रुग्ण कोरोनावर मात करून स्वगृही परतले आहेत, तर एक हजार १७९ रुग्ण उपचार घेत आहेत. तसेच ४५ वयापेक्षा जास्त असलेल्या एक लाख १७ हजार ६२७ नागरिकांचे लसीकरण गावपातळीवर झाले आहे. यासाठी ग्रामीण भागात गोठेघर (शहापूर), भिणार (भिवंडी), वरप (कल्याण), ट्रॉमा केअर सेंटर (मुरबाड) आदी ठिकाणी डेडिकेटेड कोविड केअर सेंटर उभारण्यात आले असून, त्यामुळे नागरिकांना तत्काळ सेवा मिळत आहे. या सेवेत अधिक सुलभता देण्यासाठी दांगडे यांनी या बैठकीतील सर्व खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी आदींना मार्गदर्शन केले.
..........