भिवंडी : तालुक्यातील सावंदे गावातील आदिवासी शेतक-याने जोडधंदा म्हणून पाळलेल्या बक-या माळरानावर चरावयास सोडल्या असता, त्यांच्या खाण्यात थायमेट विष आल्याने झालेल्या विषबाधेत १३ बक-या मृत्यूमुखी पडल्या. तर अजून चार बक-या अत्यावस्थ स्थितीत शेतक-याच्या घराबाहेर तडफडत आहेत.सावंदे ग्रामपंचायत हद्दीतील दशरथ गणपत भोईर या आदिवासी शेतक-याने शेतीस जोडधंदा म्हणून शेळीपालन व्यवसाय सुरू केला होता. सध्या त्यांच्याकडे पंचवीस बक-या असून त्यांनी मागील महिन्यात कोन गावातील बकरी बाजारातून ६५ हजार रु पयांच्या १२ बक-या खरेदी केल्या. नेहमीप्रमाणे त्यांनी काल शनिवारी सायंकाळी घरालगतच्या माळरानावरील शेतात आपल्या बक-या चरावयास सोडल्या होत्या. त्या घरी परतल्या नंतर एका मागून एक बक-या तडफडावयास सुरवात झाली. काही कळण्याआधीच तब्बल १३ बक-या मृत्युमुखी पडल्या असून चार बक-या अत्यवस्थ अवस्थेत स्थितीत आहेत. याची माहिती रात्री उशिरा माजी सरपंच शरद ठाकरे यांना दिल्यावर श्रमजीवी संघटनेचे तालुका पदाधिकारी मोतीराम नामखुडा यांनी घटनास्थळी संपर्क साधल्यावर सकाळी पंचायत समिती पशुधन अधिकारी आर आर पाटील यांनी शेलार पशुवैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पानसरे याना घटनास्थळी उपचारासाठी रवाना केले. त्यांनी केलेल्या पाहणीत या बक-यांना थायमेट या विषारी औषधाची लागण झाल्याचे प्राथमिक निरीक्षणातून नोंदविले आहे.ग्रामिण भागातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात लावलेल्या भाजीपाल्यावर सर्प येऊ नयेत यासाठी ब-याच ठिकाणी थायमेट या विषारी औषधाची मात्रा बांधावर टाकतात. बक-यांनी चरताना बांधावरील गवत खाताना त्यांच्या खाण्यात थायमेट आले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. एकाच वेळी बक-या मेल्याने शेतकरी दशरथ भोईर यांचे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना पंचायत समिती व आदिवासी प्रकल्प,शहापूर मार्फत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी माजी सरपंच शरद ठाकरे यांनी केली आहे .
भिवंडीत विषबाधेने आदिवासी शेतकऱ्याच्या तेरा बकऱ्या मृत्युमुखी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 2:43 PM
भिवंडी : तालुक्यातील सावंदे गावातील आदिवासी शेतक-याने जोडधंदा म्हणून पाळलेल्या बक-या माळरानावर चरावयास सोडल्या असता, त्यांच्या खाण्यात थायमेट विष ...
ठळक मुद्देसावंदे गावात विषबाधेने तेरा बक-या मृत्यूमुखीशेताच्या बांधावरील थायमेट खाण्यात आल्याने विषबाधासर्प येऊन नये म्हणून बांधावर टाकले जाते थायमेट