ठाणे : येथील जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात भरती प्रक्रिया राबण्यात येत आहे. यासाठी काढलेल्या जाहिरातीत आदिवासी तरुणांकरिता आरक्षण नसल्याचा आरोप केला जात आहे. याचा जाब विचारण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या नेतृत्वाखाली सोमवारी ठाणे जिल्हा परिषदेवर निदर्शने करण्यात येणार आहेत.
जिल्हा हा आदिवासी बहुल म्हणून ओळखला जातो. तरीही या जिल्हा परिषदेच्या आरोग्य भरतीत आदिवासींसाठी आरक्षण रद्द ठेवले नसल्याचा आरोप या परिषदेचे प्रदेश युवा अध्यक्ष लकीभाऊ जाधव यांनी केला आहे.
आदिवासी तरुणांसाठी आरक्षण न ठेवल्याने या बेरोजगार तरुणांवर अन्याय झालेला आहे. त्यांना न्याय देण्यासाठी ही भरतीप्रक्रिया तत्काळ रद्द करून या भरतीचे आरक्षण आदिवासी तरुणांसाठी लागू करून सुधारित जाहिरात प्रसिद्ध करावी, या मागणीसाठी आदिवासी तरुण जिल्हा परिषदेवर धडकणार आहेत. याचे नेतृत्व गणेश भांडकोळी, जयश्री इनामदार, शीला नवाळे, प्रदीप दुटे, रवी मराडे आदींकडून करण्यात येत आहे.