हुसेन मेमन / लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : हा आदिवासी तालुका असून बहुतांश घरे कुडा विटा मातीची व त्यांचे छप्पर कौले, झाप, धाबे याचे असल्यामुळे यंदाही त्यावर व गोठ्यावर टाकण्यासाठी ताडपत्री, प्लॅस्टिक शीट, साधी व मंगलोरी कौले, चुलीसाठी लागणारी लाकडे याच्या खरेदीसाठी सध्या जोरदार गर्दी झालेली आहे.उन्हाचे चटके इतके जोरात बसले आहेत की, आता पावसाची चाहूल लागली असल्याने, घरावरील कौलांवर अंथरण्यासाठी, कुडाच्या घरावर तसेच गायगोठ्यांच्या अवती भवती बांधण्यासाठी खुप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टीक कापड लागते. परिसरांतील आदिवासी बांधव घरात पावसाची गळती लागू नये म्हणून खूप मोठ्या प्रमाणात प्लॅस्टीक कापडाची खरेदी करत असतात. काळे प्लॅस्टीक हे सर्वात स्वस्त असून त्याचा दर ६५ ते ७५ रूपये किलो आहे. यांचा पन्हा १२ ते १५ फुटाचा असतो, निळे, पिवळे किंवा पांढरे प्लॅस्टीक उपलब्ध आहे. तसेच प्लॅस्टीकच्या घोंगड्याचीही विक्री येथे मोठ्या प्रमाणात होते आहे. घोंगड्यांचा उपयोग भर पावसांत लावणी करतांना होतो. एकेकाळी धान्याच्या पोत्याची घोंगडी केली जात असे. नंतर कांबळ्याची घोंगडी वापरली जायची पण ओली झाल्यावर ती जड होत असल्याने बांबूच्या सांगाड्याची व प्लॅस्टिक लावलेल्या इरल्याचा वापर सुरू झाला. परंतु सोसाट्याच्या वाऱ्यांत ते सांभाळणे मुश्किल होत असल्याने आता रेनकोट वापरण्याकडे कल आहे. तर प्लॅस्टिकच्या कागदाच्या घोंगड्याला नाडी बांधून वापरले जाते. काही ठिकाणी रेक्झीन्सचे घोंगडेही वापरले जाते. मात्र ते काहीसे महाग असते. शिवाय निळ्या रंगाच्या प्लास्टीक ताडपत्र्या मोठ्या प्रमाणात खरेदी केल्या जात आहेत. ती जाड असल्यामुळे टिकाऊ असते, यात ४, ६, ८ , व १२ फूटी पन्हा असतो. त्या मीटरने विकल्या जातात. पावसाळ्याच्या सुरवातीला म्हणेज फेब्रुवारी मार्च पासून मोठे व्यापारी प्लॅस्टिकच्या कापडाचा साठा करून ठेवतात व त्यांची सिझनला विक्री करतात. घाऊक बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जव्हार मधून आसपासच्या तालुक्यांतील, खेडोपाड्यातील व्यापारी प्लॅस्टीक कापड व छत्र्यांची खरेदी करीत असतात.येथे छत्र्यांचीही मोठी बाजारपेठ आहे. कडाक्याचा उन्हाळा व शाळेच्या सुट््ट्या आता अंतिम टप्प्यांत असून असह्य उन्हाबरोबरच हव्याशा वाटणाऱ्या शालेय सुट्ट्या देखील आता लवकरच संपणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक या सर्वांना शाळेचे वेध लागले आहे. सध्या विद्यार्थी जगताला दप्तर, पुस्तके, नवीन शाळेचे गणवेश, शालेय साहित्य, बूट, रेनकोट, छत्र्या याच्या खरेदीचे वेध लागले आहेत. बाजारपेठेत त्यांनी गर्दी वाढू लागली आहे. खेडोपाड्यातील विद्यार्थी खरेदीसाठीही जव्हार येथील बाजारपेठेत मोठ्या संख्येने दिसत असल्याचे दृष्य सर्वत्र दिसत आहे.
आदिवासींची पावसाळापूर्व खरेदी सुरू
By admin | Published: May 29, 2017 5:41 AM